पुण्यात नियमभंगाबद्दल ५७१ जणांवर कारवाई; कलम १८८ नुसार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:28 PM2021-04-27T22:28:57+5:302021-04-27T22:29:41+5:30
कारवाईऐवजी समजावून सांगण्यावर भर
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर गेल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वयंशिस्तीचे पालन केले जात आहे़ त्यामुळे शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा न उगारता समजावून सांगण्यावर भर दिला आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेल्या २३ दिवसात ५७१ जणांवर १८८ नुसार कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले.
गेल्या वर्षी सर्वप्रथम मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पोलिसांनी कडक धोरण स्वीकारले होते. या काळात विनाकारण बाहेर फिरणार्यांना काठीचा प्रसाद दिला. जागेवरच शिक्षा केल्या. तसेच नियमभंग करणार्या २७ हजारांहून अधिक जणांवर १८८ प्रमाणे कारवाई केली होती.
सध्या पोलिसांनी गर्दी करणार्यांवर कारवाई करण्यावर भर दिला आहे. तसेच सकाळी ११ नंतर विनाकारण फिरणार्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
शहरातील कोरोनावाढीचे दररोजचे वाढते आकडे पाहून लोकांनी स्वत: बंधने घालून घेतल्याने सध्या पोलिसांनीही कडक धोरण न स्वीकारता लोकांना समजावत आहेत. त्याचवेळी पोलिसांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा याच बरोबर दिला जात आहे.