भोर शहरात विकेंडला पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांवर कारवाई; तब्ब्ल ८५ हजारांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:51 AM2021-07-19T11:51:40+5:302021-07-19T11:51:53+5:30
शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटन स्थळी जाण्यास बंदी केली आहे.
भोर: भोर शहरात व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटन स्थळी गर्दी करण्यास बंदी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भोर पोलिस स्टेशनच्या वतीने विकेंडच्या दिवशी पर्यटनासाठी आलेल्या १७० जणांवर कारवाई करण्यात आली असून ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.
भोर पोलिस स्टेशनच्या वतीने भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मास्क न वापरणारे, विनामस्क गर्दीत वाहन चालविणारे, विनाकारण फिरणारे, पर्यटन स्थळांवर बंदी असताना विकेंड च्या दिवशी १७० जणांवर कारवाई करण्यात आली. नागरिक पर्यटन स्थळांवर बंदी असतानाही पळवाट काढताना दिसून आले. 'आम्ही शेजारील गावातील आहे' असे सांगून नागरिक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत होते. यावेळी १७० गुन्ह्यात ८५ हजार रुपयेचा दंड वसूल करण्यात आला.
भोर पोलिस स्टेशनच्या वतीने तमाम नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की, पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी आहे. शासन नियमांचे पालन करावे नागरिकांनी विनाकारण फिरू नये, तसेच मास्क चा वापर करा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. परंतु नागरिक अशी सूचना न ऐकता फिरताना दिसत होते. यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.