सव्वा सात कोटींच्या निविदा गैरव्यवहारप्रकरणी ठेकेदारावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:20+5:302020-11-22T09:39:20+5:30
लक्ष्मण मोरे / पुणे : झाडण कामाच्या सव्वा सात कोटींच्या निविदेचा मलिदा लाटण्यासाठी ठेकेदाराने बनावट लेबर लायसनद्वारे कंत्राट मिळविल्याचे ...
लक्ष्मण मोरे / पुणे : झाडण कामाच्या सव्वा सात कोटींच्या निविदेचा मलिदा लाटण्यासाठी ठेकेदाराने बनावट लेबर लायसनद्वारे कंत्राट मिळविल्याचे उजेडात येताच पालिका प्रशासनाने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. ‘लोकमत’च्या दणक्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाकडून निविदा अटी व शर्तींनुसार अनामत रक्कम जप्त करणे तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ही निविदा रद्द करुन पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये झाडण काम करण्यासाठी सात कोटी ३५ लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा भरलेल्या आठ ठेकेदारांपैकी पाच ठेकेदार अपात्र ठरले होते. तर, उर्वरीत पात्र ठरलेल्या तीन ठेकेदारांपैकी सर्वात कमी रकमेची निविदा भरलेल्या ठेकेदाराला पात्र ठरविण्यात आले होते. परंतू, पालिकेच्या काही वरिष्ठ अधिका-यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम न मिळाल्याने ही निविदा रद्द केली. त्यानंतर पुन्हा निविदा काढण्यात आली. पहिल्या निविदेमध्ये अपात्र ठरलेल्या मे. नंदिनी एंटरप्रायझेस या ठेकेदाराला पात्र करुन त्याला कंत्राट देण्यात आले.
या प्रक्रियेविरुद्ध पहिल्या निविदेत पात्र ठरलेल्या ठेकेदाराने तक्रार केली. तसेच, नंदिनी एंटप्रायझेसने सादर केलेले लेबर लायसन बनावट असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार, पालिकेने कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत केलेल्या पडताळणीमध्ये लेबर लायसन कामगार कार्यालयाकडून देण्यात आलेले नसल्याचे तसेच अतिरीक्त आयुक्त, कामगार अधिकारी यांचे सही व शिक्के, तसेच अनुज्ञप्ती बनावट असल्याचे समोर आले होते.
पालिकेच्या काही अधिका-यांना हाताशी धरुन बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल सात कोटींचे कंत्राट पदरात पाडून घेतल्याचा संपुर्ण गैरप्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. याविषयाचा ‘लोकमत’ने पाठपुरावा करीत प्रकरण लावून धरले होते.