शहरी गरीब योजनेत ‘श्रीमंतां’ना घुसवणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:57+5:302021-06-10T04:07:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान एक लाख रुपयांपर्यंतची सूट देणाऱ्या ‘शहरी गरीब वैद्यकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान एक लाख रुपयांपर्यंतची सूट देणाऱ्या ‘शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजने’त श्रीमंतांना घुसविणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्यांची नावे योजनेत घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या नगरसेवकांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
या योजनेचा काही जण गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. पालिका प्रशासनाने ‘शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजने’च्या सर्व कार्डधारकांची पडताळणी सुरू केली आहे. एक लाखापेक्षा कितीतरी पट अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनी ‘शहरी गरीब आरोग्य योजने’चा लाभ घेतला आहे.
पालिकेने मार्च, २०२१ पर्यंत १२ हजार ५०० कार्ड दिले आहेत. या कार्डधारकांची पडताळणी सुरू करण्यात आली असून यामध्ये कर भरणाऱ्या आणि मालमत्ता असलेल्या ६ हजार ५०० कार्डधारकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे़. यातील ६३२ जण हे मिळकत कर भरणा करणारे व स्वत:च्या नावे मोठी मिळकत असलेले कार्डधारक आहेत.
अनेकदा प्रशासन अशा लोकांना कार्ड देण्यास तयार नसतानाही काही नगरसेवकांच्या दबाव आणि आग्रहाला अधिकारी बळी पडतात. त्यामुळे, ही कार्ड देणारे अधिकारीही अडचणीत आले आहेत.
चौकट
“शहरी गरीब योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. अनेकदा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर नगरसेवक दबाव टाकून ही कार्ड द्यायला भाग पाडत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे प्रकार निष्पन्न झाल्यास नगरसेवकांवर कारवाई केली जाणार आहे.”
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका