पुणे शहरातील संचारबंदीचे नियम मोडून दारू पिणाऱ्या तळीरामांसह हॉटेल मालकावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 05:53 PM2021-06-06T17:53:44+5:302021-06-06T20:32:37+5:30
४१ जणांवर गुन्हा दाखल, पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
धनकवडी: शहरात कडक संचारबंदी असताना अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई मांगडेवाडी येथील हाँटेल साई गार्डन येथे करण्यात आली. तर पोलिसांनी हाँटेल मालकासह ४१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये २५ दुचाकी, एक रिक्षा, एक चारचाकी असे मिळून ७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विजय दुधाळे आणि शिंदे कात्रज परिसरात पेट्रोलिंग करत असताना मांगडेवाडी फाटा येथील साई गार्डन या हॉटेल समोरील पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क केल्या असल्याचे दिसून आले. संशयावरून आतमध्ये पाहिले असता हाँटेल मध्ये काही लोक दारू पित बसले होते. तपास पथकातील पोलिसांनी हि माहिती तात्काळ वरिष्ठ पोलिसांना यांना कळवली.
वरिष्ठ पोलिसांनी ताबडतोब अधिकचे कर्मचारी पाठवून हॉटेलवर छापा टाकला. याठिकाणी ३९ जण एकत्र बसवून दारु पित होते, त्यांच्यासह २५ मोटार सायकल, एक रिक्षा, एक कार व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ५ हजार ७४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अंमलदार विजय दुधाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.