राष्ट्रवादी-सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:44+5:302021-04-10T04:10:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढणारा कुख्यात गुंड गजानन मारणे समर्थकांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढणारा कुख्यात गुंड गजानन मारणे समर्थकांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. या मिरवणुकीत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा कोरेगाव येथील माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना पदाधिकारी संतोष शेलार याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या साठ व्यक्तींवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
साताऱ्यातील कोरेगाव येथील माजी नगराध्यक्ष संजय पिसाळ, शिवसेनेचा पदाधिकारी संतोष शेलार यांना पोलिसांनी अटक केली. सध्या ते जामिनावर आहेत. पुण्यातील सराईत गुन्हेगार आणि मोक्यातील आरोपी एजाज पठाण, व्यावसायिक राहुल दळवी याच्यावरही कारवाई केली आहे.
गजानन उर्फ गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्या नंतर भव्य मिरणवणूक काढली होती. कोरोना नियम धाब्यावर बसवीत तळोजा ते पुणे असा प्रवास मोठ्या थाटात केला होता. अनेक आलिशान मोटारकार या ताफ्यात होत्या. गुन्हेगार आणि राजकीय व्यक्ती यात सहभागी झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. व्हिडीओ छायाचित्रणात दिसत असलेली वाहने जप्त करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या साठ व्यक्तींवर कारवाई केली आहे. यात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार सहभागी झाले होते. कारवाई केलेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्या अंतर्गत कारवाई केलेले पाच आरोपी, सराईत गुन्हेगार आणि काही जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गुंड मारणेवर कारवाई केली होती. याप्रकरणी २०१४ पासून तो येरवडा कारागृहात होता. तब्बल सात वर्षांनी त्याची सुटका झाली होती.
----
पोलिसांनी २३ आलिशान वाहने केली जप्त
गजा मारणेच्या मिरवणुकीत सहभागी झालेली ४२ ते ४५ वाहने पोलिसांनी निश्चित केली आहेत. त्यातील २३ आलिशान वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. लँड क्रूझर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, फॉर्च्युनर, क्रेटा अशा आलिशान वाहनांचा ताफा मिरवणुकीत होता. या सर्वांवर कडक कारवाईची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.