मार्केट यार्डमध्ये रात्रभर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:10+5:302021-05-30T04:10:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड येथील विद्यासागर कॉलनीमधील एका बंगल्यात रात्रभर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मार्केट यार्ड ...

Action against overnight gamblers in the market yard | मार्केट यार्डमध्ये रात्रभर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

मार्केट यार्डमध्ये रात्रभर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्ड येथील विद्यासागर कॉलनीमधील एका बंगल्यात रात्रभर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मार्केट यार्ड पोलिसांनी आज पहाटे छापा घातला. या बंगल्याचा दरवाजाला बाहेरून लावलेले कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. आतील १९ जणांना अटक केली आहे. जुगार अड्डा चालविणार्‍या हर्षल पारेख याच्या सांगण्यावरून ते बंगल्यात जुगार खेळण्यासाठी आले होते. यामध्ये पिंपरी-चिंचवड येथील राजकीय कार्यकर्त्यांपासून महापालिकेतील ठेकेदारांचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून त्यांच्याकडील ५३ हजार ९०० रुपये व १ लाख रुपयांच्या ४ मोटारसायकली जप्त केले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनामास्क जुगार खेळताना आढळून आल्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केट यार्डमधील विपुल बंगल्यात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे या आपल्या सहकार्‍यांसह गेल्या. तेव्हा बंगल्याच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले होते; परंतु बंगल्याच्या खिडकीतून आत पाहिल्यावर आतमध्ये १५ ते २० जण असल्याचे आढळून आले. तेव्हा पोलिसांनी पंचासमक्ष कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमधील लोकांनी हर्षल पारेख यांच्या सांगण्यावरून आम्ही येथे जुगार खेळण्यासाठी आलो. तो तुम्हाला जेवण आणून देतो, असे सांगून बाहेरून कुलूप लावून गेला असल्याचे जुगार खेळणार्‍यांनी सांगितले. हर्षल पारेख हा मार्केट यार्ड परिसरात जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी तो बंद पाडल्यानंतर त्याने बंगल्यात जुगाराचा अड्डा सुरू केला. या ठिकाणी त्याचे वडील व त्यांचे ५ साथीदार व इतर जुगार खेळणारे आढळले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, एका ठिकाणी इतके सर्व जण एकत्र आले असल्याने पोलिसांनी या सर्वांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर सर्वांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.

Web Title: Action against overnight gamblers in the market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.