Pune Crime| मंचर, चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:21 PM2022-09-05T19:21:19+5:302022-09-05T19:23:40+5:30
औषध प्रशासन विभागाची कारवाई...
पुणे : अस्वच्छ स्थितीत खवा व गुजरात बर्फी साठविल्यामुळे मंचर येथील महावीर डेअरी ॲन्ड स्वीट मार्टवर आणि मिठाई ट्रे वर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केले नसल्याने चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने महावीर डेअरी ॲन्ड स्वीट मार्ट येथे छापा टाकून खवा व स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित २३ हजार ८०० रुपये किमतीचा ११९ किलो खवा आणि ५ हजार ६०० रुपये किमतीचा २८ किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण २९ हजार ४०० किमतीचा साठा जप्त केला. स्वीट खवा आणि गुजरात बर्फी ही साखर, दूध पावडर, खाद्यतेल, आदी घटक पदार्थांपासून बनविण्यात आल्याचे लेबलवरून स्पष्ट होते.
सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी)चा वापर करू नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खवा (गुजरात बर्फी)चा वापर करून मिठाई बनवीत असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी कळविले आहे.