मावळात सरकारी आदेशाचे उल्लंघन करून फिरणार्या २८५ जणांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:32 PM2020-07-06T17:32:25+5:302020-07-06T18:04:38+5:30
मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे.
लोणावळा : शनिवार व रविवार या दोन दिवसात मावळ तालुक्यात शासनाच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून फिरणार्या तब्बल २८५ जणांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. असे असताना देखील नियमांचे उल्लंघन करून फिरणार्यांवर वचक बसविण्यासाठी मावळ तालुक्यात लोणावळा शहर पोलिसांनी खालापुर टोलनाका, खंडाळा, वलवण, कुमार चौक, रायवुड व नौसेना बाग याठिकाणी, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोलनाका, कार्ला फाटा, मळवली, भाजे, पवनानगर, दुधिवरे खिंड याठिकाणी, कामशेत पोलीसांनी पवना चौक, भाजगाव व उंबरवाडी फाटा, वडगाव पोलिसांनी वडगाव तळेगाव फाटा व फळणे फाटा येथे तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली असताना देखील शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी मावळ तालुक्यात संचारबंदीचे उल्लंघन करून आलेल्या 285 जणांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये विना पास फिरणारे 90 जण, मास्क परिधान करून न फिरणारे 135 जण, चारचाकी वाहनांत तीन पेक्षा जास्त लोक व दुचाकी वाहनावर एक पेक्षा जास्त जण प्रवास करणारे अशा 60 जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यापुढे ही कारवाई आणखी कडक करण्याची सुचना सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचे काँवत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पुणे यांनी मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर प्रचलित कायद्याद्वारे कडक कारवाई केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे केवळ पोलिसांचे कर्तव्य नसून नागरिकांची देखील जबाबदारी आहे. नागरिकांनी या आदेशाचे पालन करत स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याचे रक्षण करत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.