मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:33 AM2021-02-20T04:33:34+5:302021-02-20T04:33:34+5:30
पुणे : शहरात सातत्याने कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढत होत असल्याने, निष्काळजीपणे वावरणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर पुणे महापालिकेने ...
पुणे : शहरात सातत्याने कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढत होत असल्याने, निष्काळजीपणे वावरणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर पुणे महापालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे़ मास्क न घालणाऱ्या नागररिकांवर दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करावी, असे आदेश अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत़
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी करावा, असे आवाहन वारंवार महापालिकेकडून करण्यात येत असतानाही, नागरिकांकडून त्याची पायमल्ली केली जात आहे़ अनेक नागरिक हे मास्क नाक आणि तोंडावर न लावता केवळ कानाला लटकवितात, गळ्याजवळ ओढून ठेवतात. दरम्यान गेल्या काही दिवसांत शहरात वाढणारी रूग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरली असून, या निष्काळजीपणामुळे कोरानाबाधितांची संख्या वाढू लागली आहे़ त्यामुळे आता पोलिसांसह पुणे महापालिकेतील सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रमुख/उपप्रमुख आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षक, परवाना निरिक्षक, मेंटेनेन्स सर्व्हेअर व कार्यालयीन अधिक्षक यांना शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये व खाजगी कार्यालये येथे विनामास्क संचार करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून पाचशे रूपये शुल्क आकारणी करण्याचे अधिकार दिले आहेत़
------------------
पोलिसांकडून २५ लाख रूपये दंड वसूल
शहर पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत मास्क न घालणाऱ्या सुमारे साडेचार हजार जणांवर कारवाई करून, २१ लाख ३९ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. तर लोहमार्ग पोलिसांनी याच कालावधीत ७२ जणांकडून एकूण ३६ हजार रुपये दंड वसूल केला आहे़
महापािलकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांनी १० ते १७ फेब्रुवारी दरम्यान एकूण १८४ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ९२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. महापािलकेने १ मे २०२० पासून ते आजपर्यंत ६ हजार ७७८ जणांवर कारवाई करून ३३ लाख ८५ हजार १०० रुपये इतका दंड वसूल केला. तुलनेत जानेवारी महिन्यात महापािलकेकडून मास्कच्या कारवाईत शिथीलता केली गेली होती़
-----------------------------