गॅसची चोरी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई, ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:09+5:302021-01-08T04:34:09+5:30
पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सोमवारी (दि. ४) दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास इंदोरी टोलनाक्याजवळील सोनू ढाब्याच्या पाठीमागील बाजूस ...
पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सोमवारी (दि. ४) दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास इंदोरी टोलनाक्याजवळील सोनू ढाब्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या येलवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत काही इसम हे एचपी कंपनीच्या १५ टन कॅप्सूलमधून घरगुती वापराच्या गॅस टाकीमध्ये धोकादायकरीत्या गॅस भरून एलपीजी गॅस काढून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करतात, अशा गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पथकाने येलवाडी परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. टोलनाक्याजवळील येलवाडी या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रुपेश रामदुलार गौड (वय २५, रा. चेंबूर, मुंबई), मुख्य वितरक दिनेशकुमार लेखरात विष्णोई (वय ३०, रा. येलवाडी, देहू, मूळगाव जोधपूर, राजस्थान), तसेच त्यांचे इतर १५ साथीदार यांच्या विरुद्ध म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच, त्यांच्याकडून ६० लाख ९६ हजार किमतीचा भरलेला कॅप्सूल गॅस टँकर, २५ लाख ८५ हजार किमतीचा एक टेम्पो, महिंद्रा पिकअप, दोन बोलेरो पिकअप, चार ॲपे, दोन छोटा हत्ती व वॅगनार अशी एकूण १० वाहने तसेच, तीन लाख १५ हजार किमतीच्या १८४ रिकाम्या गॅस टाक्या, १ लाख १६ हजार ३० रोख रक्कम, १ लाख ८८ हजार ७०० रुपयांचे १८ मोबाईल, १२ हजार १३५ रुपयांचे इलेक्ट्रिक वजनकाटे व पाईपकनेक्टर असा एकूण ६५ लाख ६८ हजार ३६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सपोनि नीलेश वाघमारे, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, नितीन लोंढे, संदीप गवारी, संतोष असवले, भगवंता मुठे, महेश बारकुले, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने, योगीनी कचरे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रशांत सोरटे, सचिन नागरे आदींनी कारवाई केली.
------
येलवाडी येथे पकडलेला गॅसचा टँकर