बारामतीत वाळू उत्खनन करणाऱ्या दोघांवर कारवाई; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 12:30 IST2022-10-07T12:29:46+5:302022-10-07T12:30:54+5:30
पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली

बारामतीत वाळू उत्खनन करणाऱ्या दोघांवर कारवाई; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सांगवी : नीरा नदीतून विना परवाना वाळू उत्खनन करणाऱ्या दोघांविरोधात माळेगाव पोलिसांनी कारवाई केली असून आरोपींकडून 3 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शंकर मोरे पोलीस कॉन्स्टेबल नेमणुक माळेगाव पोलीस स्टेशन यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र ज्ञानदेव मदने (वय 32) रा.शिरवली (ता. बारामती, जि. पुणे),अनिल नारायण रावत (वय 45),रा.शिरवली (ता.बारामती,जि.पुणे) यांच्यावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पेट्रोलिंग दरम्यान गुरुवार (दि.6) रोजी सायंकाळी नीरा नदीतून वाळू उत्खनन करून शिरवली (ता.बारामती) गावच्या हद्दीत चालक राजेंद्र ज्ञानदेव मदने हा ट्रॅक्टरवरून खांडज शिरवली मार्गे येत होता. यावेळी पोलिसांनी चालक राजेंद्र मदने याला अटक केली असून,मालक अनिल रावत हा फरार झाला आहे. यामध्ये तीन लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व डम्पिंग टेलर तसेच त्यामधील 9 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.