नीरेतील साठेबाज दुकानदारावर कृषी विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:38+5:302021-07-31T04:11:38+5:30
--- नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे युरिया खत उपलब्ध असतानाही मोठ्या शेतकऱ्यांना ते द्यायचे आहे, म्हणून सामान्य शेतकऱ्यांची ...
---
नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे युरिया खत उपलब्ध असतानाही मोठ्या शेतकऱ्यांना ते द्यायचे आहे, म्हणून सामान्य शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्याला कृषी विभागाने दणका दिला. सात दिवसांसाठी त्याचा परवाना रद्द केल्यामुळे पुढचे सात दिवस त्याला खतविक्री करता येणार नाही. नीरा येथे खतांची साठेबाजी सुरु असल्याची बातमी लोकमतने दिली होती, त्याची गांभीर्याने दखल ो त कृषी विभागाने ही कारवाई केली.
याबाबत माहिती देताना कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे म्हणाले की, १४ जुलै रोजी नीरेतील खत विक्रेत्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया देण्यास नकार दिला होता. शेतकऱ्यांनी तक्रार करताच महिला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तत्काळ दुकानास भेट दिली. महिला अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी करताना मुजोर दुकानदार आरेरावीची भाषा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
या घटनेची १५ जुलै रोजी लोकमतमध्ये ‘अधिकारी व दुकानदारात खडाजंगी’ या मथळ्याने सडेतोड बातमी प्रसिद्ध केली. दुसऱ्या दिवसापासून आधार कार्ड दाखवून शेतकऱ्यांना युरिया दिला जात होता. परंतुु घडलेल्या घटनेच्या चौकशीअंती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पुढील सात दिवसांसाठी हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नीरा येथील ग्रामपंचायत समोरील अरविंद फर्टिलायझर या दुकानदाराने १४ जुलै रोजी गुळूंचे (ता. पुरंदर) येथील शेतकरी अक्षय निगडे व नितीन निगडे यांना युरिया खत देण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली होती. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या दुकानास व गोडाऊनला भेट दिली असता त्यांच्याकडे १५० पोती युरिया शिल्लक असल्याचे आढळून आले होते.
यानंतर कृषी अधिकाऱ्यांसमोरच त्या दुकानदाराने अन्य दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांना माघारी पाठवले होते. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दुकानदारास शो कॉज नोटीस बजावत त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात अहवाल पाठवला होता. दोन आठवड्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांच्या आदेशाने ३० जुलै पासून पुढील सात दिवस हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
--
कोट. "जर एखादा कृषी निविष्ठा विक्रेता पॉस मशीनशिवाय किंवा जादा दराने युरिया विक्री करत असेल किंवा युरिया खताची साठेबाजी करुन कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी. दोष आढळलेल्या दुकानदारावर कडक कारवाई केली जाईल."
- ज्ञानेश्वर बोटे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
---
चौकट
--
कृषी विभागाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना खते वेळेत व मुबलक मिळावीत म्हणून तालुक्याचा कोटा दिला जातो. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचे आधार कार्ड दाखवण्याचा नियम आहे. पण नीरा हे शहर दोन जिल्ह्याच्या व चार तालुक्याच्या सीमेवरील गाव आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती व सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यातील मोठे शेतकरी नीरा येथील खत विक्रेत्यांकडून मोठ्याप्रमाणावर खत उचलतात. पर्यायाने पुरंदरच्या छोट्या शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. यापुढे फक्त पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनाच युरियासारखी खते मुबलक प्रमाणात मिळावीत, अशी अपेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.
---
फोटो क्रमांक : ३० नीरा साठेबाजी
फोटोओळ : नीरा (ता.पुरंदर) येथील साठेबाज दुकानदाराचा परवाना निलंबित करत कृषी विभागाने कारवाई केलेले दुकान. (छाया : भरत निगडे)