अकारण सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:07+5:302021-05-16T04:11:07+5:30
पुणे : रुग्णवाहिकांचे सायरन अकारण वाजविल्यास एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी ...
पुणे : रुग्णवाहिकांचे सायरन अकारण वाजविल्यास एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी घेतला असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
डॉ. जगदीश हिरेमठ यांनी आमदार शिरोळे यांना सुचविले की, रस्त्यावर गर्दी आणि वाहतूक नसतानाही रुग्णवाहिकांचे चालक अकारण हॉर्न वाजवतात. सोबत सायरन सुरू ठेवतात. त्यामुळे साथीच्या काळात लोकांच्या मनात अकारण भीती निर्माण होऊन नैराश्य येते. याचा परिणाम वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे.
ही बाब आमदार शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले.
चौकट
चालक-मालकावर गुन्हा
अकारण सायरन वाजविणाऱ्या रुग्णवाहिका ध्वनी प्रदूषण करत असल्याने मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९० (२) आणि कलम १९४ एफनुसार चालक व मालक यांच्यावर प्रथम गुन्ह्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये आणि दुसऱ्या व त्यापुढील गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात यावी, असा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी काढला असल्याचे आमदार शिरोळे यांनी कळवले.