सहायक आयुक्तांवर कारवाई
By Admin | Published: August 17, 2016 12:51 AM2016-08-17T00:51:10+5:302016-08-17T00:51:10+5:30
महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत आरोग्याचा प्रश्न गाजल्यानंतर आयुक्तांनी आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मिनिनाथ दंडवते यांची उचलबांगडी केली आहे
पिंपरी : महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत आरोग्याचा प्रश्न गाजल्यानंतर आयुक्तांनी आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मिनिनाथ दंडवते यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्याकडे झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभाग दिला आहे.
महापालिका सभेत आणि स्थायी समिती सभेत शहरातील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य विभागाकडून कामात होत असलेल्या हलगर्जीपणामुळे, डासांची संख्या वाढल्याने विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाकडून कामात होत असलेल्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप केला. काळेवाडीतील नगरसेवकांनी, घरापुढील रस्त्यावर कचरागाडी न आणता या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धटपणे वर्तन केले जात आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख सक्षम नाहीत, त्यांना हटवा, अशी मागणी केली होती. त्यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवा, अशी वारंवार मागणी सदस्यांनी केली.
पथारी, हातगाडीवाल्यावर कारवाई करा
रस्त्यावरील पथारीवाले, हातगाडीवाले व टॅ्रव्हल्स व्यवसाय करणारे यांच्यावर ठोस कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशा सूचना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलावून वाहतुकीच्या समस्याबाबत ठोस कारवाई करण्याच्याही सूचनाही केल्या.
साने चौक, चिखली येथे विविध कामांची पाहणी आयुक्तांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहर सुधारणा समिती सभापती स्वाती साने, नगरसदस्य दत्ता साने, अजय सायकर, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, देवण्णा गट्टूवार, लिहाकत पीरजादे, संजय भोसले, तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले उपस्थित होते.
आयुक्तांनी कमी दाबाने मिळणारे पाणी, पावसाळी गटार योजना याची पाहणी केली. तसेच नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची व्यवस्था करणे, चिखली गावठाण मुख्य चौकातील पुरूष व महिलांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाची देखभाल-दुरुस्ती करणे, चिखली येथील भाजीपाला विक्रेत्यांसाठी व या परिसरातील राहणाऱ्या भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गेट तयार करून देणे, टॉयलेटची सोय करून देणे, तसेच ऊन-पावसापासून विक्रेत्यांच्या संरक्षणासाठी शेड उभारणी करणे, भाजी मंडईची अंतर्गत दुरुस्ती करणे, रस्ता तयार करण्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूद कमी पडल्यास इतर लेखाशीर्षकावरील तरतूद वर्ग करून काम पूर्ण करावीत याबाबत सूचना केल्या. याबाबत तातडीने सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, आयुक्तांनी चिखली परिसरातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. समस्या जाणून घेतल्या. संबंधितांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. या वेळी नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. आयुक्तांनी सतत भेटी द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)