फर्ग्युसन रस्त्यावरील 'त्या' हॉटेलवर कारवाईला सुरुवात; हॉटेलच्या मॅनेजरसह ४ कर्मचारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 07:29 PM2024-06-23T19:29:18+5:302024-06-23T19:29:46+5:30

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल असून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू

Action begins on that hotel on Ferguson road An employee along with the manager of the hotel was detained | फर्ग्युसन रस्त्यावरील 'त्या' हॉटेलवर कारवाईला सुरुवात; हॉटेलच्या मॅनेजरसह ४ कर्मचारी ताब्यात

फर्ग्युसन रस्त्यावरील 'त्या' हॉटेलवर कारवाईला सुरुवात; हॉटेलच्या मॅनेजरसह ४ कर्मचारी ताब्यात

पुणे: पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे दिसतंय. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. 

कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन मुलाला मद्य सेवन करण्यास दिल्याप्रकरणी ब्लॅक आणि कोझी पबच्या मालकासह, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. महिनाभरानंतर त्यांची नुकतीच जामिनावर मुक्तता करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरील द लिक्वीड लिझर लाऊंज उर्फ एल३ हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. याच पबमध्ये तरुण- तरुणी मद्यपान करत होते, शौचालयात काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 

एक्साईज विभागाचे अधिकारी चरण सिंग राजपूत यांनीही पुण्यातील या हॉटेल जवळ तातडीने गेल्याने आता प्रकरणाला एक्साईज विभागाकडून देखील कारवाईला सुरुवात झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल असून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे.  या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर त्या हॉटेलच्या मॅनेजरसह ४ कर्मचारी ताब्यात घेतले आहेत.  

पबमध्ये ड्रग्ज कोण सप्लाय करतय...?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन मुले चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे एका पॅडवर ड्रग्ज टाकून एटीएम कार्डने लाईन ओढताना दिसत आहेत. एमडी प्रकारातील हे ड्रग्ज असल्याचे देखील प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे पबमध्ये ड्रग्ज नेमके कोण सप्लाय करत आहे? या ड्रग्ज विक्रेत्यांवर कुणाचा आशीर्वाद आहे? पोलिसांचे पेट्रोलिंग पथक नेमके कुठे गस्त घालत होते? असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने  पुढे आले आहेत.

Web Title: Action begins on that hotel on Ferguson road An employee along with the manager of the hotel was detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.