बेदरकार नागरिकांसह व्यापारी आस्थापानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:29+5:302021-03-30T04:09:29+5:30
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्री आठनंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून रात्री अकरानंतर नियंत्रित संचारबंदी लागू ...
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्री आठनंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून रात्री अकरानंतर नियंत्रित संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र, नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या पालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कसबा-विश्रामबाग, ढोले पाटील रस्ता, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत १०० पेक्षा अधिक हॉटेल, व्यापारी आस्थापना आणि नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे, आरोग्य निरीक्षक संदीप रोकडे, मोकादम अतुल रासगे, सतीश मारकड, सुनील चांदणे, दिपक साळुंखे यांच्या पथकाने बी. टी. कवडे रोड परिसरात दुकान, हॉटेल, आदी नियमभंग करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली. ही दुकाने रात्री आठ वाजता बंद करण्यात न आल्याने तसेच नियमांचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणारे व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या, कचरा वर्गीकरण न करता देणाऱ्या नागरिकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून या सर्वांकडून सोळा हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. यासोबतच लहान मोठ्या २० हॉटेलसह ५० अन्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
तर, कसबा - विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सर्व आरोग्य निरीक्षक यांनी प्रभाग क्र. १५, १६ व २९ मधील
व्यावसायिक व नागरिक यांच्यावर मास्क न वापरणे , सामाजिक अंतर न पाळणे , कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनाचे पालन न करणे, अस्वच्छता पसरविणे, अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्यांमध्ये दहा हॉटेलचा समावेश आहे. एकूण ३६ जणांवर कारवाई करीत ३५ हजार ८४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यासोबतच धनकवडी सहकारनगर कार्यालयाच्या पथकाने प्रभाग क्र. ३९ व ४० मधील पुणे सातारा मुख्य रस्ता परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई केली. या कारवाईत साडे नऊ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक महापालिका आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नरेंद्र भालेराव, अमोल लांडगे, शांताराम सोनवणे, अब्दुलकरीम मुजावर, दिनेश सोनवणे, नितीन राजगुरू, प्रमोद ढसाळ, प्रियांका कंक, भारती कोठाले आरोग्य निरीक्षक सहभागी झाले होते.