हेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:29 PM2018-11-20T13:29:57+5:302018-11-20T14:04:28+5:30
हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने हेल्मेटला कधीच विरोध केला नाही. पण....
पुणे : हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने हेल्मेटला कधीच विरोध केला नाही. पण पोलिसांकडून सक्तीचे भुत पुणेकरांच्या लादले जात आहे. नवीन अधिकारी आले की हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतात. हा निर्णय केवळ प्रसिध्दीसाठी घेतला जातो. सर्वसामान्यांचे मत जाणून घेतले जात नाही. त्यामुळे आता पहिल्यांदा पोलिसांना सक्तीविरोधात निवेदन दिले जाईल. त्यानंतरही सक्ती कायम ठेवल्यास रास्ता रोको, निदर्शने, सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने मंगळवारी दिला.
पुणे पोलिसांकडून येत्या १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरूवात शहरात मंगळवारपासून करण्यात आली. हेल्मेट न घातलेल्या दुचाकीवरील सरकारी कर्मचाºयांवर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. यापार्श्वभूमीवर हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची बैठक आनंदऋषी ब्लड बँकेच्या आवारात झाली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर शांंतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, भाजपाचे संदीप खर्डेकर, काँग्रेसचे संजय बालगुडे, शिवसेनेचे शाम देशपांडे, मनसेच्या रुपाली पाटील, रिपब्लिकन पक्षाचे मंदार जोशी, धनंजय जाधव, विश्वास चव्हाण, बाळासाहेब रुणवाल, गिरीश भिलारे, प्रफुल्ल देशमुख आदींनी सहभाग घेतला.
बैठकीमध्ये हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध करण्यात आला. त्यानंतर पुढील रुपरेषा निश्चित करण्यात आली. पुढील एक-दोन दिवसांत पोलिसांना हेल्मेटसक्ती न करण्याबाबत निवेदन दिले जाईल. त्यानंतरही निर्णय न बदलल्यास चौका-चौकात निदर्शने, जाहीर सभा, रास्ता रोको आणि शेवटी सविनय कायदेभंग असे टप्प्याटप्याने आंदोलने केली जातील, अशी माहिती काकडे यांनी दिली. हेल्मेटसक्तीचे भुत पुणेकरांवर लादु नका, त्यासाठी दरवेळी आंदोलन करावे लागते. पुणेकरांचे स्वातंत्र्य हिरावून घेउ नका, असे सुरतवाला म्हणाले. पक्षभेद विसरून सर्वांनी हेल्मेट सक्तीविरोधात रस्त्यावर उतरावे. सर्वसामान्य नागरिकांनीही कृती समितीला पाठिंबा देत सक्तीविरोधी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
----------------------