पुण्यातील खंडपीठासाठी कृती समिती
By admin | Published: May 1, 2017 02:32 AM2017-05-01T02:32:23+5:302017-05-01T02:32:23+5:30
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या पुढाकाराने कृती समिती
पुणे : मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या पुढाकाराने कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीची पहिली बैठक शनिवारी पुणे जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल येथे पार पाडली.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर यांनी यावेळी कृती समितीची पुढील रूपरेषा मांडली. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ वकील असे मिळून एकूण २५० हून अधिक वकिलांचा या कृती समितीत समावेश करण्यात आलेला आहे.
यावेळी दादासाहेब बेंद्रे, हर्षद निंबाळकर, अहमदखान पठाण, व्ही. डी. कर्जतकर, एन. डी. पाटील, गणेश कवडे, वैशाली चांदणे, विजय सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी खंडपीठ मागणीबाबत मनोगते व्यक्त केली.
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटना, लहान-मोठे व्यावसायिक, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था अशा सर्व प्रकारच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा पाठिंबा मिळवून खंडपीठ मागणीची चळवळ प्रभावी करण्याचे प्रयत्न करायचे, असा ठराव यावेळी करण्यात आला. पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंत झंजाड, संतोष जाधव, आॅडिटर कुमार पायगुडे, सदस्य, स्वप्निल काळे आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आंदोलनाची चाळिशी
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, ही मागणी पुण्यातील वकिलांकडून गेली ४० वर्षे केली जाते आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी आतापर्यंत वकिलांकडून वेळोवेळी वेगवेगळी आंदोलने करून या मागणीकडे लक्ष वेधण्यात येते आहे. मात्र अद्यापही या मागणीकडे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यासाठी वकिलांनी आता कायमस्वरूपी कृती समिती स्थापन केली आहे. त्याची पहिली बैठक शनिवारी पार पडली.