सलग तिसऱ्या दिवशीही वाळूसम्राटांवर कारवाई
By admin | Published: January 26, 2016 01:44 AM2016-01-26T01:44:40+5:302016-01-26T01:44:40+5:30
उजनी धरणातून वाळूउपसा करणाऱ्या बोटी जिलेटिनच्या साह्याने उडवून दिल्या. त्यामुळे वाळूसम्राटांचे धाबे दणाणले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
भिगवण : उजनी धरणातून वाळूउपसा करणाऱ्या बोटी जिलेटिनच्या साह्याने उडवून दिल्या. त्यामुळे वाळूसम्राटांचे धाबे दणाणले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
आज कुंभारगाव (ता. इंदापूर) हद्दीत केलेल्या कारवाईत या अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटी उडविण्यात आल्या. काही वाळूमाफियांनी आपल्या बोटीवर कारवाई होऊ नये, म्हणून त्या पाण्यात बुडवून टाकल्या.
तहसीलदार येवले यांनी पाणबुडीच्या साह्याने तपास लावून पाण्यातच बोटींचा श्रीगणेशा केला. तीन दिवस चाललेल्या या कारवाईत ४७ बोटी फोडण्यात आल्या आहेत. यात वाळू माफियांचे २ कोटींच्या पुढे नुकसान झाले आहे.
बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, दौंड, करमाळा (जि. सोलापूर) येथील तहसीलदार आणि इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या संयुक्त पथकाने वाळू माफियांचे नामोनिशाण मिटविण्यासाठी केलेल्या संकल्पाचे सामान्य नागरिकांतून कौतुक केले जात आहे. वाळूउपसा करणाऱ्यांना मदत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर वाळूचोरीचा बोजा नोंद करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याने वाळूमाफियांनी उजनीपासून दूर राहणेच पसंत केल्याचे चित्र दिसले. (वार्ताहर)