वाळूसम्राटांवर धडक कारवाई
By admin | Published: June 17, 2016 05:03 AM2016-06-17T05:03:03+5:302016-06-17T05:03:03+5:30
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करून वाळू चोरून नेणारे पाच ट्रक व त्यामधील पंचवीस ब्रास वाळू, असा ७६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज गेल्या दोन
इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करून वाळू चोरून नेणारे पाच ट्रक व त्यामधील पंचवीस ब्रास वाळू, असा ७६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज गेल्या दोन दिवसांत इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पाच वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
संतोष बापू आढाव (वय २०, रा. डाळज नं. १, इंदापूर), राहुल राजेंद्र उमाप (वय २०, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे), धनाजी हणमंत लांडगे (वय ३०, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), सोमनाथ भारत सोलणकर (वय २०, चंदनवाडी, ता. दौंड, जि. पुणे), रियाज उस्मान पठाण (रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड विधान ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीची वाळू आणि पंचाहत्तर लाख किमतीचे ट्रक, असा पोलिसांनी जप्त केलेल्या मालाचा तपशील आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्यासह राहुल दत्तात्रय बडे, अर्जुन बाळासाहेब मानसिंग आदींसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दि. १४ व १५ जून दरम्यान ही कारवाई केली आहे.
संतोष आढाव या ट्रकचालकास (एमएच १२ एफझेड ३८९२) वाळू चोरून घेऊन जाताना इंदापूर शहरातील डॉ. कदम यांच्या हॉस्पिटलजवळ पकडण्यात आले. राहुल उमाप या वाहनचालकास ट्रक (एमएच १२ एमव्ही १७२८) मधून वाळू चोरून घेऊन जाताना इंदापूर शहरातील बाबाचौकात पकडले. धनाजी लांडगे या चालकास ट्रक (एमएच १२ जेझेड ७१७१) मधून वाळू चोरून घेऊन जाताना इंदापूर शहरातील डॉ. पाणबुडे यांच्या दवाखान्याजवळ पकडले. सोमनाथ सोलनकर या वाहनचालकास ट्रक (एमएच १२ एचडी ३५१४) मधून वाळू चोरून घेऊन जाताना शिरसोडी गावच्या हद्दीत पकडले. रियाज पठाण या वाहनचालकास ट्रक (एमएच १२ एचडी ५११४) मधून वाळू चोरून घेऊन जाताना माळवाडी गावातील पेट्रोल पंपासमोर पकडले.