बारामतीत अतिक्रमणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 11:48 PM2018-12-15T23:48:28+5:302018-12-15T23:48:52+5:30
२२ बेकायदा कत्तलखाने हटविले : तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
बारामती : नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी राबविलेल्या मोहिमेत गावडे चौकात एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन करवाईला विरोध केला. मात्र, वेळीच नगरपालिकेच्या अधिकाºयांनी हस्तक्षेप करून या तरुणाला रोखल्याने अनर्थ टळला.
बारामती शहरात शुक्रवारपासून (दि. १४) अतिक्रमण विभागाने अतिक्रमाणे काढण्यास सुरुवात केली आहे. वारंवार दिलेल्या नोटिसांना व्यावसायिकांनी दाद न दिल्याने नगरपालिकेला कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शुक्रवारी म्हाडा कॉलनी परिसरातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करीत येथील २२ अतिक्रमणे नगरपालिकेने हटविली. यावेळी कत्तलखान्यांमधून निघणारे दुर्गंधीयुक्त घाण पाणी जमिनीमध्ये सिमेंट पाईप टाकून नदीपात्रामध्ये बेकायदा सोडल्याचे नगरपालिका प्रशासनास आढळून आले. नगरपालिकेने येथील सर्व अतिक्रमणे हटविली असून ही जागा उद्यानासाठी राखीव असल्याचे यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले. तसेच येथील नगरपालिकेच्या जागेची निश्चिती करण्यात आली आहे. या जागेला लवकरच सात फुटी संरक्षक भिंत उभारली जाणार असल्याचेही नगरपालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, शनिवारी (दि. १५) शहरातील शिवाजी गावडे चौकात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला येथील एका तरुणाने विरोध केला. त्याच्या बाजूची सर्व अतिक्रमण केलेली दुकाने हटवा; अन्यथा अतिक्रमण काढू नका, अशी मागणी करीत प्रशांत सरतापे या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी वेळीच त्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेनंतर पोलीस संरक्षणदेखील मागवण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी सांगितले, की येथील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
अतिक्रमण केलेल्या सर्व व्यावसायिकांना याआधीच नोटीस देण्यात आली होती. त्या नोटीसमधील मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. मात्र, येथील दुकानदारांनी दुकानातील माल हलविण्यासाठी २४ तासांची मुदत यावेळी नगरपालिकेकडे मागितली आहे. त्यामुळे २४ तासांपर्यंत येथील कारवाई थांबवण्यात आली आहे. यावेळी शहर अभियंता आर. पी. शहा, राजेंद्र शिंदे, जमाल शेख, सागर भोसले, किरण साळवी, अनिल सरोदे, अजय देशमुख, अनेश मोरे यांनी या करावाईत सहभाग घेतला होता.