पुण्यात अन्न व औषध प्रशासनाक़डून निरा थंडपेयावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 05:02 PM2019-04-11T17:02:06+5:302019-04-11T17:02:36+5:30
सर्व थंडपेयांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे.
पुणे : राज्यात सध्या कडक उन्हाळा सुरु आहे. या उन्हाळ्याच्या झळा सोसताना शरीराला थंडपेयांचा आधार शोधतो. या थंडपेयात ऊसाचा रस, फळांचा ज्यूस, सरबत, आणि निरा या पेयांचा समावेश आहे. पण या सर्व थंडपेयांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे. त्याच पार्श्वभूमीवर जुन्या जिल्हा परिषद कार्यालयाजवळील नीरा सहकारी सोसायटी लिमिटेड मार्फत विकल्या जाणाऱ्या निरा या पेयावर अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गुरुवारी (दि. ११ ) कडक कारवाई करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निरा या पेयामध्ये पाणी व बर्फ यांची भेसळ करून निरा सहकारी सोसायटीकडून नीरेचा साठा वाढविला जात होता.ग्राहकांना शुध्द व कोणतीही भेसळ न करता निरा देणे अपेक्षित आहे.मात्र,जुन्या जिल्हा परिषदे जवळील नीरा विक्री केंद्रात भेसळ केल्याचे आढळून आले.एफडीएकडून ७ हजार ३०० रुपये किमतीची १४६ लिटर निरा जप्त करून नष्ट करण्यात आली.ही कारवाई एफडीएचे अधिकारी संपत देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी , सीमा सोनकांबळे यांनी ही कारवाई केली.