पुण्यातील सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाची कारवाई; शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:19 PM2021-11-25T16:19:18+5:302021-11-25T16:19:35+5:30
कारवाईत जनावरांच्या गोठ्यासह दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे
पुणे: पुणेवनविभाग अंतर्गत असलेल्या भांबुर्डां वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याकडून सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत खानापूर येथे कारवाई करण्यात आली असून २ शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. मरगळे कुटुंबियांबरोबरच अन्य शेतकऱ्यांची येथे वस्ती आहे. या कारवाईत जनावरांच्या गोठ्यासह दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे. यावेळी गरिबांना कायदा दाखवला जात असल्याचा संताप संबंधित शेतकरी कुटुंबातील तरुण व महिलांनी व्यक्त केला आहे.
आज पहाटे अंधार असतानाच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह इतर चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही मरगळे बंधूंचे घर उध्वस्त केले. शासनाकडून अद्याप ये-जा करण्यासाठी रस्ता, वीज, पाणी अशी कोणतीच व्यवस्था येथे करण्यात आलेली नाही. आजूबाजूला जंगल असल्याने येथे जंगली प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून मरगळे बंधूंनी घरापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून लोकवस्ती जवळ जनावरांसाठी व राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. पिकवलेले धान्य व इतर घरसामान त्यांनी येथे ठेवले होते.
सायंकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा
संध्याकाळ पर्यंत सामान घेवून जा नाहीतर गाडीत भरुन घेऊन जाणार. असे उपस्थित असणाऱ्या वन अधिकाऱ्यांनी अस्ताव्यस्त व मोडतोड करण्यात आलेले घरसामान, धान्य संध्याकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा दिला. जर साहित्य नेले नाही तर आम्ही संध्याकाळी गाडी भरुन घेऊन जाऊ असेही मरगळे यांना सुनावले.
''आम्ही सकाळी यायच्या आत त्यांनी जेसीबी आणून सगळं आमचं नुकसान केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं होत कि हे काढणार आहे. पण त्यांनी काही ऐकलं नाही. धान्य, भांडीकुंडी सर्व मोडलेले आहे. चार महिन्याच प्रॉब्लेम असतो. घरापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. तसेच ग्रामपंचायतकडूनही पाणी लाईटची सोय करून दिली नाही. असे ज्ञानेश्वर धाकू मरगळे यांनी सांगितले आहे.''
"संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती व त्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. काही जीवनावश्यक साहित्य आम्ही बाजूला काढून ठेवले आहे. इतर अवैध अतिक्रमणांबाबत आमची शोधमोहीम सुरू आहे. योग्य पडताळणी करुन कारवाई करण्यात येत आहे. जेथे वन कायद्यांचा भंग झाल्याचे आढळेल तेथे कारवाई होईल असे खानापूर वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले आहेत."