मुळशीतील चार जणांवर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई
By admin | Published: July 28, 2016 03:54 AM2016-07-28T03:54:18+5:302016-07-28T03:54:18+5:30
मुळशी तालुक्यातील ४ जणांची तालुक्यातील वास्तव्यामुळे व हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याकारणाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार पुणे
पुणे : मुळशी तालुक्यातील ४ जणांची तालुक्यातील वास्तव्यामुळे व हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याकारणाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्वत: लक्ष घालत पुणे जिल्ह्यातून (पुणे शहरासह) तडीपारीची कारवाई केली आहे.
यामध्ये सचिन गणपत कुरपे (वय ३६, रा. अकोले, ता. मुळशी, जि. पुणे), भानुदास बाळू अमराळे (वय ३३), रामदास बाळू अमराळे (वय ३६), सागर दिलीप कुंभार (वय २९, तिघेही रा. अमराळेवाडी, ता. मुळशी) यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.
मे २०१५ मध्ये अमराळेवाडी (ता. मुळशी) येथे बेकायदेशीर जमाव जमवून या टोळीने हैदोस घालत अनेक वाहनांची तोडफोड करून दरोडा घातला होता. या प्रकरणी नितीन मारुती अमराळे (वय ३०) यांनी पौड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार या टोळीतील १८ आरोपींना अटक करण्यात आली होती. याअगोदर मुळशी तालुक्यातील ७० पेक्षा जास्त गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्याने ते येरवडा कारागृहात असून मुळशी तालुक्यात गुंडगिरी करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे धोरण पोलिसांनी अवलंबिले आहे. या चार जणांवर कोथरूड पोलीस ठाणे आणि पौड पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यामुळे मुळशी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. नागरिकांच्या जीविताच्या व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व त्यांची दहशत कमी करण्यासाठी त्या चौघांना तडीपार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली. (वार्ताहर)