वारंवार चुक करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई : विद्यापीठाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 06:05 PM2019-10-07T18:05:13+5:302019-10-07T18:05:44+5:30
प्राध्यापकांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे...
पुणे : विद्यार्थ्यांचे विविध अंतर्गत परीक्षांचे गुण ऑनलाईन पध्दतीने भरताना प्राध्यापकांकडून चुका होत असल्याने सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाकडून महाविद्यालयावर कारवाई केली जात होती. परंतु, आता वारंवार चूक करणाऱ्या संबंधित प्राध्यापकावरचविद्यापीठाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन गुण भरताना प्राध्यापकांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांचे गुण नियोजित कालवधीत भरून द्यावे लागतात. मात्र, अनेक प्राध्यापकांकडून वेळेत गुण भरून दिले जात नाहीत. तर काही प्राध्यापकांकडून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर चुकीचे गुण भरले जातात. त्यामुळे विद्यापीठाकडून संबंधित प्राध्यापक काम करत असलेल्या महाविद्यालयावर कारवाई केली जात होती. विद्यापीठाने याबाबत कडक नियमावली तयार केली होती. परंतु, अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार कडक नियमावलीवर पुनर्विचार करण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.या समितीने विद्यापीठाला नुकताच अहवाल सादर केला असून कडक नियमावलीत सुधारणा करत त्यात शिथिलता आणली आहे.
अरविंद शाळिग्राम म्हणाले, दहा पेक्षा कमी चुका झाल्यास प्राध्यापकांकडून नजर चुकीचे ही चुक झाली असे गृहित धरले जाईल. मात्र, त्यापेक्षा जास्त चुका झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित प्राध्यापकाने तीन वेळा चुक केल्यानंतर जुन्या नियमावलीनुसार कारवाई होईल. चुका करणाऱ्या प्राध्यापकांना विद्यापीठाच्या प्रमाद समिती समोर उभे रहावे लागेल.एका प्राध्यापकाने केलेल्या चुकीची शिक्षा पूर्ण महाविद्यालयाला का? अशी चर्चा केली जात होती. त्यामुळे आता संबंधित प्राध्यापकाला कारवाईला सामोरे जावे लागेल.येत्या सोमवारी (दि.७) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित नियमावली प्रसिध्द केली जाईल.