लोणी मध्ये मटक्याच्या धंद्यावर छापा; ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:39 PM2021-06-19T12:39:08+5:302021-06-19T12:44:36+5:30
72 जण ताब्यात
लोणी काळभोर : ऊरूळी कांचन ( ता हवेली ) येथे सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा व युनिट ६ च्या पथकाने तीन पत्त्यांच्या खेळाचा क्लब व मटक्याच्या धंद्यावर छापा मारून एकूण ७२ जणांना ताब्यात घेतले आहे. ग्रामीण भागातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. ७२ लोकांवर एकाचवेळी कारवाई करण्यात आल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पत्त्याच्या क्लबवर टाकलेेेल्या छाप्यात ६० जणांवर कारवाई करून १ लाख ४४ हजार २१० रुपये रोख रकमेसह १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी व जुगार खेळण्याची साधने जप्त करण्यात आली आहेत तर युनिट ६ ने मटक्यावर घातलेल्या छाप्यात १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी ९२ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
उरुळी कांचन भागात पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल गारवा नजीक खेडेकर मळा येथे संजय बडेकर याने जुगार अड्डा सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली होती. याची शहनिशा करण्यासाठी उपायुक्त श्रीनिवास घाडगे हे पथकाबरोबर मध्यरात्री सदर ठिकाणी गेले असता त्यांना येथे रम्मीचा खेळ सुरू होता. येथे कारवाई करून सदर अड्डा चालवणारे बडेकर याच्यासमवेत अनिल कांचन, अतुल उर्फ आप्पा कांचन व योगेश उर्फ बाळा कांचन या भागीदारासह ६० जनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई सुरू असताना युनिट ६ च्या पथकाने येथून काही अंतरावर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून मटका चालक मंगेश कुलकर्णी याचेसह १२ जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या दोन्ही कारवाया एका गावात व एकाच वेळी झाल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
सदर कारवाई ही हिमनगाचे छोटे टोक मानले जाते. कारण लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत असलेल्या प्रत्येक गावात अवैध दारू विक्रीसह जुगार व मटक्याचे अड्डे व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. सदर पोलीस ठाण्याचे शहरामध्ये विलणीकरण झाले त्यावेळी सदर अवैध धंदे समूळ नष्ट होतील अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती. परंतू ते पुर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू असल्याने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला आहे.