हडपसर येथे गणेश मंडळांचे अध्यक्ष व डी.जे.चालकांवर कारवाई : साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:55 PM2018-09-21T20:55:31+5:302018-09-21T20:55:55+5:30
सात दिवसांच्या व नऊ दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डी. जे. वापरणाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे.
पुणे : ध्वनि प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर व डी. जे. मालकांवर हडपसरपोलिसांकडून कारवाई केली आहे. सात दिवसांच्या व नऊ दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डी. जे. वापरणाºयांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे.
मगरपट्टा परिसरात अखिल भोरी भडक मित्र मंडळाकडून डीजेसह मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत आवाजाची पातळी १२० डेसीबल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी डीजेचे साहित्य जप्त करून गणेश मंडळाचे अध्यक्ष चंदन कैलास तुपे व उपाध्यक्ष सुजित दिलीप माने तसेच डीजे मालक साहील सय्यद मुन्नावर यांच्यावर कारवाई केली.
दुसऱ्या घटनेत मांजरी येथे सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राजहंस गणेश मित्र मंडळ यांनी वाहनात फेरफार करून डीजे लावला होता. पोलिसांनी त्याची पातळी मोजली असता ती १०० डेसीबल पेक्षा जास्त असल्याची आढळले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष गिरीश कानकाटे व डीजे मालक राजू तावडे कृष्णराज यांच्यावर कारवाई करून डीजे साहित्य जप्त केले. तर तिसऱ्या घटनेत मगरपट्टासिटी येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत स्टार सिझन गणेश मंडळाकडून मोठ्या आवाजात डीजे लावल्याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना तक्रार केली होती. त्यांच्या डीजेच्या आवाजाची पातळी तपासली असता ती १०० डेसीबल पेक्षा जास्त आढळली. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत दिलीप मोरे, उपाध्यक्ष विक्रम गाटे, डीजे मालक दिगंबर नारायण उंदरे, चालक अतुल संभाजी अटोळे यांच्यावरही कारवाई केली. त्यांचे डीजे चे साहित्यही जप्त केले आहे. अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे व पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. हडपसर परिसरात गणेशोत्सवा दरम्यान शेवटच्या दिवशी अशीच जोरदार कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले.