अवैध बांधकामांवर कारवाई
By admin | Published: March 31, 2017 02:50 AM2017-03-31T02:50:50+5:302017-03-31T02:50:50+5:30
गेल्या काही वर्षांपासूनचा अवैध बांधकामांचा अधांतरी आणि तारांकित प्रश्न अद्याप काही सुटलेला नाही शहरातील सुमारे
वाकड : गेल्या काही वर्षांपासूनचा अवैध बांधकामांचा अधांतरी आणि तारांकित प्रश्न अद्याप काही सुटलेला नाही शहरातील सुमारे लाखाच्या वर अवैध बांधकामांवर आजही टांगती तलवार असतानाच गेल्या दोन महिन्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महापालिका अधिकारी कामात व्यस्त आणि नागरिकांचे बांधकाम मस्त अशा स्वरूपात राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयावर जिकडे तिकडे अवैध बांधकामांना मोठे पेव फुटल्याचे चित्र होते.
याच धर्तीवर महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने थेरगावातील गणेशनगर परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तात ११ बांधकामांवर हातोडा फिरविला आहे. निवडणुकानंतरची ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
सकाळी ११च्या सुमारास एकता कॉलनी परिसरातून कारवाईला सुरुवात झाली. तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टर, तीन ट्रक आणि १५ मजुरांच्या साहाय्याने १०८१ स्क्वेअर मीटरची ११ बांधकामे पाडण्यात आली. सकाळी ११ च्या सुमारास एकता कॉलनीतील कुंजीर यांच्या बांधकामावर हातोडा फिरला. कारवाई सुरु होताच परिसरातील रहिवाशांनी रस्त्यांवर एकच गर्दी केली होती. यातील सर्वांना महापालिकेने नोटीस बजावली होती. कारवाईचा शेवट लोकमान्य कॉलनीतील सुंदर सरोदे यांच्या बांधकामावर करण्यात आला. सरोदे यांच्या दोन्ही स्लॅपला ब्रेकरच्या साहाय्याने मोठे होल पाडण्यात आले.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेचे २४ आणि वाकड ठाण्यातील २८ पोलिसांचा ताफा तैनात होता. कारवाई दरम्यान माजी नगरसेवक अॅड सचिन भोसले, संतोष बारणे यांनी घटनास्थळी भेट देऊन बांधकामे न पाडता अधिकाऱ्यांना थोडा वेळ द्यावा, नागरिकांना बाजू मांडण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंती करण्याचा प्रयत्न केला असता आमच्याकडे तक्रारी आल्या असून आम्ही यांना नोटीस बजाविली होती, असे सांगण्यात आले. ही कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(वार्ताहर)
आरोप : चेहरे पाहून कारवाई
महापालिकेचे अधिकारी चेहरे पाहून कारवाई करीत आहेत, हे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद करावे. कोणालाही नोटीस न देता थेट बांधकामे पाडली जातात. हे अप्रशासकीय आहे. लोकांना त्यांची बाजू मांडण्यास संधी द्यावी अन् न्यायालयाने सांगितले की बांधकाम अनियमित आहे, तर निश्चित कारवाई करावी. मात्र विनाकल्पना आणि चेहरे पाहून कारवाई कारवाई थांबवावी. आम्ही कुठल्याही परिस्थितीत जनतेसोबत आहोत. हा प्रश्न मी सभागृहात उपस्थित करणार आहे.
- अॅड सचिन भोसले (नगरसेवक)