पुणे-सोलापूर महामार्गावरील अवैध वाहतुकीवर कारवाई
By admin | Published: March 25, 2016 03:47 AM2016-03-25T03:47:19+5:302016-03-25T03:47:19+5:30
पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक ‘लोकमत’मध्ये बातमी
लोणी काळभोर : पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच बंद करण्यात आली.
काही अंशी पॅगो रिक्षा अद्यापही चालू असल्याने २५ मार्चपासून सहाआसनी रिक्षाचालक लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचे चिंतामणी सहाआसनी रिक्षा संघाचे अध्यक्ष व पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
झेंडे म्हणाले, ‘‘सध्या हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरांत परवाना नसलेल्या आणि स्क्रॅप झालेल्या पॅगो रिक्षा, तसेच जिल्ह्याबाहेरील सहाआसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. यासंदर्भात अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद व्हावी व सहाआसनी रिक्षाचालकांना न्याय मिळावा, याकरिता रिक्षा संघाच्या वतीने पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर, परिवहन विभाग, वाहतूक शाखा हडपसर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना एका निवेदनाद्वारे ही अवैध प्रवासी वाहतूक २५ मार्चपर्यंत कायमस्वरूपी बंद न झाल्यास सर्व सहाआसनी रिक्षाचालक उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत लोकमतमध्ये बुधवारी (दि. २३) पुणे - सोलापूर महामार्गावर अवैध वाहतूक या मथळ्याखाली छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध झाली़
याची दखल घेऊन हडपसर वाहतूक शाखेकडून हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे - सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली़
मात्र, असे असूनही कालबाह्य (स्क्रॅप) करण्यात आलेल्या काही पॅगो रिक्षा अद्यापही पुणे- सोलापूर महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याने सर्व परवानाधारक सहाआसनी रिक्षाचालक २५ मार्चपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचा निर्णय श्री चिंतामणी सहाआसनी रिक्षा संघाच्या वतीने घेण्यात आला आहे. (वार्ताहर)