न्यायाधीशांनीच केली फुकट्या प्रवाशांवर कारवाई
By admin | Published: March 22, 2017 03:21 AM2017-03-22T03:21:21+5:302017-03-22T03:21:21+5:30
रेल्वे न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वत: पुढाकार घेत स्वत: रेल्वेतून पुणे-सातारा-पुणे असा प्रवास करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई
पुणे : रेल्वे न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वत: पुढाकार घेत स्वत: रेल्वेतून पुणे-सातारा-पुणे असा प्रवास करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली़ यामध्ये ११३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़
रेल्वे न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संजय सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली २ तिकीट तपासनीस, न्यायालयाचे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस यांनी सुवर्णजयंती एक्स्प्रेसमधून पुण्याहून साताऱ्यापर्यंत अचानक तपासणी केली़ त्यानंतर साताऱ्याहून बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेसने पुण्यापर्यंत तपासणी केली़ त्यात विनातिकीट प्रवास करणारे, पायऱ्यांवर उभे असणारे, फेरीवाले, तसेच डब्यात जुगार खेळणाऱ्यांना पकडण्यात आले़
सुवर्णजयंती एक्सप्रेसमध्ये पेंट्रीकार असून त्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असते़ या गाडीतील १७ कर्मचाऱ्यांपैकी २ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी सांगितले़