कारवाईपूर्वी रिक्षाचालकांचे ऐकून घ्या, वेशांतर करून पोलिसांची रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:49 AM2017-12-27T00:49:25+5:302017-12-27T00:49:33+5:30
पुणे : वेशांतर केलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचा-यांकडून रिक्षाचालकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे.
पुणे : वेशांतर केलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचा-यांकडून रिक्षाचालकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. रिक्षाचालकांनी भाडे नाकारलेले नसताना पोलीस त्यांची बाजू ऐकून न घेताच त्यांचा वाहतूक परवाना जप्त करत आहेत. मात्र, वाहतूक परवाना जप्त करून रद्द करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आहेत. त्यामुळे आरटीओने रिक्षाचालकांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटनांच्या वतीने केली जात आहे.
शहरातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना चांगली वागणूक दिली जात नाही, त्यांच्याकडून मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही, अशा तक्रारी आरटीओ कार्यालयाकडे केल्या जातात. मात्र, सर्वच रिक्षा चालकांकडून प्रवाशांची फसवणूक केली जात नाही. अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. त्यामुळे रिक्षाचालकांवर विनाकारण कारवाई करू नये, अशी अपेक्षा रिक्षाचालक संघटनांकडून केली जाते. त्यात, गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस विभागाच्या कर्मचाºयांनी वेशांतर करून रिक्षाचालकांवर भाडे नाकारत असल्याचे कारण दाखवून कारवाई केली जात आहे. याबाबत वाहतूक पोलीस विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. मंगळवारी आणखी काही रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांनी आरटीओ कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्याशी याबाबत चर्चा केली.
पुण्यात कोणतेही मोठे गुन्हे घडत नाहीत. त्यामुळेच वाहतूक पोलीस विभागाने वेशांतर केलेल्या पोलिसांकडून भाडे नाकारणाºया रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे का? असा सवाल नितीन पवार यांनी उपस्थित केला. तसेच पोलीस कर्मचाºयांना ठराविक दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. त्यामुळेच कोणतीही चूक नसताना रिक्षाचालकांकडून बळजबरीने हा दंड वसूल केला जात आहे. त्यांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधीही दिली जात नाही. पोलिसांकडून संबंधित चालकाचा वाहतूक परवाना जप्त केला जातो.
>अंदाज घेऊन सांगितले जाते भाडे
महिला पोलीस कर्मचारी साधा पोशाख परिधान करून रिक्षामध्ये बसतात. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किती पैसे लागणार, अशी विचारणा करतात. मीटरप्रमाणे पैसे होतील, असे सांगितल्यानंतरही अंदाजे रक्कम विचारली जाते. मीटरप्रमाणेच पैसे होतील, असे वारंवार सांगूनही सतत रक्कम विचारतात. निश्चित ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ आणि किलोमीटर यांचा अंदाज घेऊन रिक्षाचालक रक्कम सांगतात. त्यानंतर त्वरित त्याच्यावर भाडे नाकारल्याबद्दल कारवाई केली जाते.
- मनोज पिल्ले, माजी अध्यक्ष भीमशक्ती रिक्षा संघटना