चाकण येथे वाहनचालकांवर कारवाई
By admin | Published: April 26, 2017 02:50 AM2017-04-26T02:50:02+5:302017-04-26T02:50:02+5:30
चाकणमध्ये कित्येक दिवसांपासून दुचाकीस्वार व अवैध वाहतूक आणि अवास्तव वाहतूकधारकांनी नियम पायदळी तुडविण्याचा जणू घाट घातला होता.
आसखेड : चाकणमध्ये कित्येक दिवसांपासून दुचाकीस्वार व अवैध वाहतूक आणि अवास्तव वाहतूकधारकांनी नियम पायदळी तुडविण्याचा जणू घाट घातला होता. राजकीय पुढाऱ्यांच्या नावाखाली मोठे धाडस करून वागणाऱ्या वाहनचालकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांपासून परत कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत सुमारे दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सोमवार (दि. २४) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणच्या सिग्नल चौकात व आळंदीफाटा येथे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पकडलेली वाहने सोडविण्यासाठी काही पुढारी मंडळींनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती, फोनाफोनी करण्याचे प्रकार केले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पोलिसांनी दंडात्मक कारवाया करूनच संबंधित वाहने सोडली. याकामी बऱ्याच पोलिसांनी फोन बंद करणे पसंत केले.
या भागात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांना ठोकर देणे, मद्यपान करून वाहने चालविणे, पादचाऱ्यांना जखमी करणे असे प्रकार वारंवार
घडत आहेत.
वाहतुकीचा बोजवारा आणि बेदरकार चारचाकी व दुचाकीस्वारांचा वाढता उच्छाद कमी व्हावा, बेशिस्त चालकांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळता यावी, हॉटेल व रस्त्यावरील दुकानांच्या बाहेरील वाहनांचा गराडा कमी व्हावा आणि वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना दयाळ, महेश मुंडे, श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील साळुंखे, शिवाजी नऱ्हे, राजेंद्र हिले, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश दिघे, पोलीस नाईक संजय जरे, अमोल बोराटे व जिल्हा वाहतूक शाखेचे नेश्वर शेवरे, रितेश थरकार, दत्ता मोरे, राणी मोटे, रेश्मा फापाळे यांच्या दोन पथकाने दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. (वार्ताहर)