सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई
By Admin | Published: August 31, 2016 12:56 AM2016-08-31T00:56:06+5:302016-08-31T00:56:06+5:30
गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या समोर नो पार्किंगच्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या केलेल्या आलिशान गाड्यांना जॅमर लावून दंड वसुलीची कारवाई सलग दुसऱ्या
पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या समोर नो पार्किंगच्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या केलेल्या आलिशान गाड्यांना जॅमर लावून दंड वसुलीची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही पिंपरी वाहतूक शाखेने सुरू ठेवली होती़ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ७ ते ८ मोटारगाड्यांना जॅमर लावून दंड वसूल केला़ महापालिकेच्या समोर असलेल्या रस्त्यावर नेहमी मोटारगाड्यांची पार्किंग केलेली असते़
शहरातील अनेक राजकीय पदाधिकारी, नागरिक विविध कामांसाठी पालिकेत येतात़ परंतु, पालिकेच्या आवारात मोटारगाड्यांना पार्किंग करायला जागा मिळाली नाही, तर त्यांच्याकडून रस्त्यावर मोटारगाड्या पार्क केल्या जातात़ मात्र, दोन दिवसांपासून पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा कडक बडगा उगारत नो पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या आलिशान मोटारगाड्यांना जॅमर लावून कारवाई केली जात आहे़
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाच्या वरिष्ठांकडून सक्त सूचना करण्यात आल्या आहेत़ त्यानुसार नो पार्किंगचा दंड दोनशे रुपयांऐवजी चारशे रुपये केला आहे़ जर नो पार्किंगमध्ये मोटारगाडी पार्क करून ड्रायव्हर गाडीत असेल, तर दोनशे रुपयांच्या दंडाची तरतूद नवीन वाहन कायद्यानुसार करण्यात आली आहे़
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळेस मोटारगाड्यांची गर्दी होत असते़ त्याचे नियोजन कर्मचाऱ्यांकडून केले जाते. मात्र, अनेक वाहनचालकांकडून
पालिका वगळता दुसऱ्या ठिकाणी मोटारगाडी पार्क करण्यासाठी टाळाटाळ केली जाते़ हे वाहनचालक रस्त्यावरच मोटारगाड्यांची
पार्किंग करतात़ मागील काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागाकडे जॅमर उपलब्ध झाल्यामुळे कारवाईचा वेग वाढला आहे़.