जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई! ४१ कोटींचे टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्याला अटक
By अबोली कुलकर्णी | Published: May 23, 2022 12:22 PM2022-05-23T12:22:51+5:302022-05-23T13:07:20+5:30
अटकेत असलेल्या व्यापाऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...
पुणे : बनावट खरेदी बिलांच्या आधारे ४१ कोटी रुपयांचे बोगस इनपूट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा ७ कोटी ३८ लाख रुपयांचा टॅक्स बुडविणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक केली आहे. प्रवीण भबूतमल गुंदेचा असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जिरावाला मेटल्स या व्यापाऱ्याने जवळपास ४१ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा ७ कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल बुडविला. हे चौकशीत आढळल्यानंतर गुंदेचा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्याचा कसून शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत १० कारवाया करण्यात आल्या आहेत. सहायक आयुक्त सतीश पाटील, सचिन सांगळे, दत्तात्रय तेलंग व अन्वेषण विभागातील राज्य कर निरीक्षक यांचा या कारवाईत सहभाग होता.
वस्तू व सेवा कर विभागाकडे बोगस व्यापाऱ्याची माहिती असून, त्यांच्यावर भविष्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे.
- धनंजय आखाडे,
अपर राज्यकर आयुक्त, पुणे क्षेत्र