पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

By राजू हिंगे | Published: November 29, 2023 06:57 PM2023-11-29T18:57:11+5:302023-11-29T19:02:58+5:30

नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने गेल्या वर्षीपासून महापालिकेने या बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली

Action of Pune Municipal Corporation; 139 abandoned vehicles found on roads and footpaths were confiscated | पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या वाहनांवर नोटीस चिटकविण्यात येणार आहे. त्यानंतर सात दिवसात ही वाहने न हटवल्यास ही वाहने जप्त केली जात आहे. त्यानुसार पालिकेने आता पर्यत १३९ वाहने जप्त केली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी बेवारस वाहने आढळतात. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच येथे नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सातत्याने येत असतात. त्यामुळे गेल्या वर्षीपासून महापालिकेने या बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली होती.

या कारवाईत शहरातून १२०० वाहने उचलण्यात आली होती. त्यासाठी ४० ते ५० लाख रुपयांदरम्यान खर्च आला. यापैकी काही वाहने मालकांनी शुल्क भरून सोडवून नेली. तर उर्वरित वाहनांचा लिलाव करण्यात आला. त्यातून महापालिकेला सव्वा कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर , महापालिकेतर्फे पुन्हा बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे. वाहनचालकांना या मोहिमेत उचलण्यात येणारी वाहने निर्मूलन शुल्क भरून परत नेता येतील. प्रवासी बस, ट्रकसाठी २५ हजार, दहा टन वजनापर्यंतच्या हलक्या वाहनांसाठी २० हजार, चारचाकी वाहनांसाठी १५ हजार, तीन चाकी वाहनांसाठी दहा हजार, दुचाकींसाठी पाच हजार रुपये शुल्क महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २०१७ मध्येच निर्धारित केले आहे. हे शुल्क भरून संबंधित वाहनमालक एक महिन्याच्या आत आपले वाहन सोडवून नेऊ शकतील.

वाहन उचलण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयातर्फे संबंधित वाहनावर नोटीस चिटकवण्यात येईल. त्यानंतर सात दिवसात वाहन न हटवल्यास हे वाहन जप्त केले जाईल. आतापर्यंत १३९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय आपल्या परिसरातील बेवारस वाहनांची माहिती 96 899 31 900 या whatsapp नंबर वर फोटो आणि लोकेशन सह पाठवावी असे आवाहन पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

Web Title: Action of Pune Municipal Corporation; 139 abandoned vehicles found on roads and footpaths were confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.