हडपसर परिसरात दहशत माजविणार्या सराईत गुंडावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई
By विवेक भुसे | Published: December 10, 2023 12:49 PM2023-12-10T12:49:25+5:302023-12-10T12:50:37+5:30
एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
पुणे : हडपसर परिसरात दहशत माजविणार्या गुंडावर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एम पी डी ए कायद्याखाली कारवाई केली असून त्याची एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. गौरव संतोष अडसुळ (वय २०, रा. शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
गौरव अडसुळ हा त्याच्या साथीदारांसह हडपर परिसरात लोखंडी कोयतासह जबरी चोरी, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. शेवाळीवाडी येथील मिठाईच्या दुकानात जूनमध्ये साथीदारांसह शिरुन तोडफोड केली होती. त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध गेल्या ५ वर्षात ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्याच्या दहशतीमुळे लोक तक्रार देण्यास पुढे येत नाही़ त्यामुळे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि पी सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी गौरव अडसुळ याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी त्याला मंजुरी देत अडसुळ याला एक वषार्साठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी आतापर्यंत ६७ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.