Ruby Hall Clinic: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकवर कारवाई; अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:39 PM2022-04-12T21:39:03+5:302022-04-12T21:39:10+5:30
किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे : किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना आरोग्य विभागाने निलंबित केला आहे. चौकशी समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात आला आहे. आता रुग्णालयाकडून काय पावले उचलली जाणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाने ५ दिवसांपूर्वी रुबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. ही अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुबी हॉलमध्ये झाली होती. कोल्हापूर येथील महिलेला एजंटाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे अमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. मात्र त्यानंतर आर्थिक व्यवहार फिस्कटल्याने त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. रुग्णाशी पत्नीचे नाते आहे असे सांगून हे अवयवप्रत्यारोपण करण्यात आले होते. मात्र आता ‘मी पत्नी नव्हेच' असा पवित्रा घेऊन तिने पोलीसात तक्रार अर्ज केला आहे.
या विषयावर गदारोळ झाल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अवयवरोपणासाठीची रुग्णालयाला जी परवानगी आहे ती निलंबित का करू नये, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले होते. याबाबत आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे म्हणाल्या, ‘किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.’