पुण्यात अनधिकृत पब, बारवरील कारवाई अचानक ‘थंड’! संख्या ४० वरून थेट २ वर, प्रशासनावर संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 12:25 PM2024-06-02T12:25:25+5:302024-06-02T12:26:49+5:30
शहरात सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल, पब, बारमुळे सर्वाधिक त्रास निष्पाप नागरिकांना होत असतानाही, प्रशासनाचा बेजबाबदारपणा संतापात भर टाकणारा आहे
पुणे: धनाढ्य बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत कल्याणीनगर येथे दोघांना चिरडून ठार केले. या घटनेनंतर एक्साइज विभागाने शहरात तीन-चार दिवस जोरात माेहीम राबवून ५० पेक्षा अधिक पब, बारवर कारवाई केली. महापालिकेकडून देखील रुफटॉप हॉटेलवर कारवाईचे नाटक केले गेले. एक्साइज विभागाला कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. असे असताना अचानक ही मोहीम थंड झाल्याने पुन्हा एकदा पुणेकरांकडून प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे.
अल्पवयीन मुलाने केलेल्या पराक्रमानंतर पोलिस प्रशासन, ससून रुग्णालय, एक्साइज खाते, आरटीओ, महापालिका, मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोहोचलेले आमदार सुनील टिंगरे, त्याचबरोबर देशभर चर्चा सुरू असलेल्या हास्यास्पद आणि कायद्याची लाज निघेल, असा जामीन देणारे बाल हक्क मंडळ ही सर्वच यंत्रणा किती खोलवर पोखरली गेली याचाही पुरावा समोर आला होता.
कार अपघातानंतर शहरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात करत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बार, पब आणि रुफटाॅप हाॅटेलवर धडक कारवाई करत बुलडोझर फिरवला. ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू दिली त्याठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली. या पबचे मालक आणि व्यवस्थापक आजही न्यायालयीन कोठडीत आहेत.
शहरात एक्साइजचा वेग मंदावला
शहरात १९ मे रोजी अपघात झाल्यानंतर ज्या वेगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एक्साइजने कारवाईचा धडाका लावला होता, तो कारवाईचा वेग मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा थंडावला आहे. अपघात घडल्यानंतर २२ मे रोजी शहरात तब्बल ४० ठिकाणी कारवाई केली होती, मात्र आता तोच आकडा ३० मेपर्यंत फक्त २ वर येऊन पोहोचला आहे. कारवाई सुरू केल्यापासून २२ ते २९ मे या कालावधीत ७७ प्रकरणांमध्ये कारवाई झाली. मात्र, हा कारवाईचा धडाका पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत सातव्या दिवसापर्यंत पूर्णतः थंडावला आहे. त्यामुळे ही कारवाई अचानक का थंडावली, अशी चर्चा पुणेकरांमध्ये सुरू झाली आहे.
शहरात अजूनही अनधिकृत रुफटॉप हॉटेल, पब आणि बार
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या सहा दिवसांमध्ये ७७ अनधिकृत पब, बारवर कारवाई करून एक लाख ७ हजार २९९ चौरस फुटाचे बांधकाम पाडले. त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रुफ टाॅप हॉटेल, पब, बार असल्याची चर्चा आहे. राजकीय वरदहस्त लक्षात घेऊन कारवाईस टाळाटाळ केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापुढे कारवाई चालू राहणार की नाही? याकडे पुणेकरांचे लक्ष आहे. शहरात सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल, पब, बारमुळे सर्वाधिक त्रास निष्पाप नागरिकांना होत असतानाही, प्रशासनाचा बेजबाबदारपणा संतापात भर टाकणारा आहे.