पीएमपी बसमधील पाकीटमार महिला जेरबंद, वाकड पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:17 AM2017-12-18T05:17:29+5:302017-12-18T05:17:49+5:30
वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात महिला डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती.
वाकड : पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग लांबविणा-या सराईत चोर महिलेला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास थेरगाव, डांगे चौकात करण्यात आली. वनिता राख साखरे (वय ४०, रा. हडपसर) असे महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात महिला डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. पोलिसांनी छायाचित्रे पाहिले आणि ती पाकीट मारणारी महिला असल्याचे लक्षात येताच तिला ताब्यात घेतले. तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला आहे़ वनिता साखरे पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स पाकीट लांबवित आहे. बसमधील महिलांचे पाकीट मारल्याप्रकरणी तिच्यावर स्वारगेट आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. १२ डिसेंबरला प्रवासादरम्यान एका महिलेच्या पर्समध्ये असलेली दीड तोळ्याची चैन पर्ससह तिने पळविली होती. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने तिच्या मागावर होते.