टीकेपेक्षा कृतीची आवश्यकता

By admin | Published: March 31, 2017 02:59 AM2017-03-31T02:59:09+5:302017-03-31T02:59:09+5:30

‘पिंपरी-चिंचवडकरांचे पाप इंद्रायणी नदीत’ वाहत असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आळंदीमध्ये केले

Action requirement than vaccine | टीकेपेक्षा कृतीची आवश्यकता

टीकेपेक्षा कृतीची आवश्यकता

Next

पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवडकरांचे पाप इंद्रायणी नदीत’ वाहत असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आळंदीमध्ये केले. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली.
ज्या पिंपरी-चिंचवडकरांनी पालिका ते पार्लमेंट अशी सत्ता भाजपाला दिली, त्यांच्याविषयी असे बोलणे चुकीचे असल्याचा आक्षेप विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी शब्द मागे घेण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या नदी प्रदूषणावर मुख्यमंत्र्यांनी बोलण्याअगोदर निधीअभावी लालफितीत अडकलेल्या नदीसुधार प्रकल्पाला आवश्यक निधी उपलब्ध करून
द्यावा, अन्यथा नदी प्रदूषणावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही, अशा प्रतिक्रिया दिली आहे. नदी प्रदूषणावर टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्री यांनी तोडगा काढावा, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.(प्रतिनिधी)

ज्या पिंपरी-चिंचवडकरांनी सत्ता दिली त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. हा सामान्य लोकांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना नदी प्रदूषणावरच बोलायचे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. कारण पिंपरी-चिंचवडकरांसाठी आवश्यक असणाऱ्या नदीसुधार प्रकल्पाला लालफितीत अडकवून ठेवले आहे. आता भाजपाची सत्ता आहे, तर मुख्यमंत्र्यांनी नदीसुधार प्रकल्पाला निधी द्यावा. तसेच पिंपरी-चिंचवडकरांबद्दल केलेले विधान मागे घ्यावे. - संजोग वाघेरे
(शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)


मुख्यमंत्र्यांनी जी शब्दयोजना केली, ती आक्षेपार्ह आहे. ‘पिंपरी-चिंचवडकरांचे पाप’ असे बोलणे संयुक्तिक नाही. नदीप्रदूषण होत आहे, याबाबत आम्ही सर्वजण सहमत आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ टीका न करता यावर कृती करणे अपेक्षित आहे. आळंदी नगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या नदी प्रदूषणावर तोडगा काढावा. - सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस पक्ष

पिंपरी-चिंचवडकरांचे पाप काढत बसण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिला पाहिजे. पिंपरी-चिंचवडकरांनी पालिका ते पार्लमेंट अशी सत्ता भाजपाला दिली आहे. त्या जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. नदीतील प्रदूषण पिंपरी-चिंचवडकरांचे पाप वाटत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी नदीसुधार प्रकल्पाला निधी उपलब्ध करून द्यावा.
- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांबद्दल रोष व्यक्त केला आहे. हे करीत असताना मुख्यमंत्र्यांनी जपून विधान करणे गरजेचे होते. अशा विधानामुळे सामान्य नागरिकांचा अवमान झाला आहे. आळंदीची दुर्दशा होण्यास भाजपाचेच सरकार जबाबदार आहे. अर्थसंकल्पात इंद्रायणी नदीसुधारसाठी भरीव तरतूद गरजेची असताना तसे झाले नाही. अशा विधानांमधून राज्य सरकारचे अपयश लपवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.- मानव कांबळे,
अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला शहरातील प्रदूषकेच कारणीभूत आहेत. महापालिके ने तयार केलेल्या नदीसुधार प्रकल्पात प्रदूषण कमी करण्यासंबंधी ठोस उपाययोजनाच नाही. या प्रकल्पात केवळ सुशोभीकरणावर भर दिला गेला आहे. म्हणूनच या प्रकल्पाला निधी मिळणे कठीण झाले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने नदीसुधार प्रकल्पाच्या निधीची वाट न पाहता सतत कार्यशील राहिले पाहिजे. - विकास पाटील,
अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती

Web Title: Action requirement than vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.