फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा पुन्हा दणका; सात हजार चौरस फुट बांधकाम जमीनदोस्त
By राजू हिंगे | Published: December 4, 2023 04:51 PM2023-12-04T16:51:21+5:302023-12-04T16:51:56+5:30
लोखंडी एंगल, गर्डर ,पत्रे इ. चे सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता
पुणे: फर्ग्युसन रस्त्यावर बांधकाम विकास विभागाचे वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. शिरोळे प्लॉट येथील विनापरवाना शॉपिंग मॉल वर ही कारवाई करण्यात आली. लोखंडी एंगल, गर्डर ,पत्रे इ. चे सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता. या कारवाईत सुमारे सात हजार चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.
यामध्ये छोटी मोठी मिळून ७० स्टॉल वजा दुकाने चालू होती. या कारवाईस मे. न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले होते. यामुळे कारवाई करता येत नव्हती. प्रशासनाने मोठे वकील देवून आठ वर्ष चाललेला स्थगिती आदेश उठवून घेतला. लगेच मे. उच्च न्यायालया मध्ये कॅवेट दाखल केले. आणि तातडीने कारवाई केली. या कारवाईत सुमारे सात हजार चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.
या मॉल मुळे फर्ग्युसन रोड वर वाहतुकीचा ताण येत होता. तसेच मॉल मध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने आणि मॉल मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते असल्याने आगी सारखी दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली असती. एक जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनिस आदी कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. सदर कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ यांनी पूर्ण केली.