रिक्षाचालकांवर कारवाई
By admin | Published: October 6, 2016 03:26 AM2016-10-06T03:26:09+5:302016-10-06T03:26:09+5:30
गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई
हडपसर : गाडीतळ आणि गांधी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गणवेश, बॅच व परवाना नसलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
गाडीतळ चौकात ज्या रिक्षाचालकांकडे बॅच, गणवेश, परवाना नाही आणि वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, अशा ठिकाणी उभ्या केलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई झाली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षाचालकांबरोबर इतरही वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.
हडपसर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस हवालदार आनंद कांबळे, सुनील बोरकर, पोलीस शिपाई दीपक कांबळे आणि महिला पोलीस शिपाई श्यामल सातपुते यांनी १५ रिक्षांवर कारवाई केली. गाडीतळ चौकात तीनआसनी रिक्षाचालकांचे अनधिकृत सात रिक्षातळ असून, त्यातील तीन अनधिकृत आहेत. अधिकृत असलेल्या ठिकाणी तीन-चार रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी आहे; मात्र तेथे १० ते १५ रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नियम पाळा,
अपघात टाळा
४झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉपलाइनवर थांबा व पादचाऱ्यांचा आदर करा, लाल दिवा लागल्यानंतर थांबा, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे टाळा, सिटबेल्ट, हेल्मेटचा वापर करा आणि अॅम्ब्युलन्सला प्राधान्याने रस्ता मोकाळा करून द्या असे साधे नियम वाहन चालविताना पाळून आणि संयम ठेवून पुण्याच्या संस्कृतीची ओळख वाढवू या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गाडीतळ
मध्यवर्ती ठिकाण
४हडपसरगाव आणि परिसरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी प्रमुख ठिकाण म्हणून गाडीतळ ओळखले जाते. पूर्र्वी या ठिकाणी बैलगाड्या थांबत होत्या त्यावरून या ठिकाणाला गाडीतळ असे नाव पडले आहे. त्यानंतर या ठिकाणी जकात नाका सुरू केला होता. आता या ठिकाणी पीएमपीचा बसथांबा आणि पोलीस ठाणे आहे.
उड्डाणपुलाचे नियोजन चुकले
४गाडीतळावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे नियोजन केले. सुरुवातीला आकाशवाणी ते वैदूवाडी चौकदरम्यान पाच किलोमीटर लांबीचा आणि सासवडकडे एल, तसेच मगरपट्टा चौकातही एल अशी रचना होती. मात्र, हा पूल अवघा ९०० मीटर झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली. त्यानंतर मगरपट्टा चौकात आणि गाडीतळावर उड्डाणपुलावर दोन पूल उभारले. मात्र, अद्यापही गाडीतळावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.