वाळूमाफियांवर कारवाई
By admin | Published: March 2, 2016 01:09 AM2016-03-02T01:09:38+5:302016-03-02T01:09:38+5:30
येथील शिवारातील मदगुलेमळा वस्तीजवळील ओढ्यातून बेकायदेशीर पणे वाळूउपसा करीत असताना महसूल खात्याच्या पथकाने छापा टाकला.
बेल्हा : रानमळा (ता. जुन्नर) येथील शिवारातील मदगुलेमळा वस्तीजवळील ओढ्यातून बेकायदेशीर पणे वाळूउपसा करीत असताना महसूल खात्याच्या पथकाने छापा टाकला. मात्र, वाळूचोर यंत्रसामग्री जागेवरच सोडून पळून गेले. पथकाने एक जेसीबी व एक ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिला. या पथकाने सोमवारी (दि. २९) पहाटे ही कारवाई केली.
झापवाडी, मंगरुळ, बोरी, साकोरी, रानमळा आदी ठिकाणातील ओढ्यातून बेकायदेशीरपणे वाळूची चोरटी वाहतूक होत होती.
याची माहिती महसूल खात्याला
होती. रानमळा येथील मदगुलेमळा
या ठिकाणी प्रांताधिकारी
कार्यालयाचे पथक व जुन्नरचे मंडलाधिकारी सचिन मुंढे, डी. बी. काळे, गावकामगार तलाठी
धनाजी भोसले, दिलीप पवार
आदींचे एक पथक कारवाईसाठी गेले होते.
या महसूल खात्याच्या पथकाने मदगुलेमळा वस्तीजवळील ओढ्यातून वाळू बेकायदेशीरपणे उपसा करीत असतानाच छापा टाकला.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळूचोरटे यंत्रसामग्री जागेवरच सोडून पळून गेले. महसूल खात्याच्या पथकाने वाळूचोरट्यांनी जागेवरच सोडून दिलेला एक जेसीबी व एक ट्रॅक्टर यांचा पंचनामा करून तो पोलिसांच्या ताब्यात दिला.
याबाबत जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
(वार्ताहर)