इंदापूर, वेल्ह्यात वाळूतस्करांवर कारवाई
By admin | Published: June 20, 2016 01:11 AM2016-06-20T01:11:33+5:302016-06-20T01:11:33+5:30
वाळूउपसा करणाऱ्या बोटींचा पाठलाग करून तहसीलदार वर्षा लांडगे व महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली.
इंदापूर : वाळूउपसा करणाऱ्या बोटींचा पाठलाग करून तहसीलदार वर्षा लांडगे व महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील चांडगाव भागातील नदीपात्रात पाच बोटी जप्त केल्या. त्या क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांची इंजिने फोडली.
सकाळी सात वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. मध्यंतरी काही काळ कारवाई
झाली नसल्याने निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी परत डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. बोटींच्या संख्येत वाढ झाली होती. नेमक्या या पार्श्वभूमीवर आज महसूल विभागाने दणका दिला. त्यामुळे पळापळ झाली. काही बोटी भिगवणच्या दिशेने पळाल्या. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन, इंजिने फोडून बोटींची गच्छंती करण्यात आली. बेकायदा बिगरपरवाना वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध होणाऱ्या कारवाईमध्ये पाटबंधारे विभागाने व ग्रामपंचायतीने सहभाग घेतला पाहिजे; तसेच ग्रामपंचायतीने वाळू वाहतुकीस निर्बंध घातले पाहिजेत, अशी तहसीलदार वर्षा लांडगे यांनी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)
अंबवणे मंडल : मार्गासनी वेल्हे तालुक्यातील अंबवणे मंडलातील अनधिकृत उत्खननाबाबत कारवाई करण्यात आली. काही वाहनांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार वनश्री लाभसेटवार यांनी दिली.
९ जून रोजी सकाळी तहसीलदार वनश्री लाभसेटवार यांनी अनधिकृत उत्खननाबाबत शोधमोहीम राबविली. यामध्ये अंबवणे मंडलातील अकरा वीटभट्ट्यांचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यात अंदाजे ८ हजार १५८ ब्रास माती दिसून आली आहे. पंचनामा करताना वीटभट्टीमालक व उपस्थितांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत, यामुळे पंचनामे करण्यात आल. येथील अकरा वीटभट्टीधारकांना खुलासा करण्यासाठीच्या नोटिसा दिल्या आहेत. वीटभट्टीधारकांनी ५ दिवसांच्या आत खुलासा न केल्यास अनधिकृत उत्खनन आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार वनश्री लाभसेटवार यांनी सांगितले.
या कारवाईत अंबवणे येथे क्रशर वाहनचालकांकडून ४३,५९४ रुपये दंड वसूल करण्यात आला. मार्गासनी येथे गट नं. २०९ मध्ये अनधिकृत गौणखनिज उत्खनन करताना ५ ट्रॅक्टर व एक जेसीबी आढळून आले होते. या वाहनांकडून १,५८,९९२ रुपये दंड वसूल करण्यात आला. वेल्हे तालुक्यात प्रथमत:च एवढी मोठी कारवाई करण्यात आल्याने अनधिकृत वाहतूक करणारे व अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.