कामगार पुरवणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:03+5:302021-01-13T04:24:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी व कामगारांचे थकीत वेतन त्वरीत मिळवून द्यावे असा आदेश कामगार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी व कामगारांचे थकीत वेतन त्वरीत मिळवून द्यावे असा आदेश कामगार आयुक्तांनी महावितरणला दिला. महावितरणच्या मंचर विभागातील कामगारांनी थकीत वेतनाच्या निषेधार्थ कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी दिवसभर धरणे आंदोलन केले.
कामगार आयुक्त विकास पानवलकर यांनी सायंकाळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाबरोबर चर्चा केली व महावितरणला आदेश बजावला. भारतीय मजदूर संघाबरोबर संलग्न संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, राहुल बोडखे, सागर पवार, आदिनाथ शेटे, अशोक गहिने, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी चर्चेत सहभागी झाले होते.
मेंगाळे यांनी सांगितले की राज्यात १२ हजारपेक्षा अधिक कामगार कंत्राटी आहेत. ठेकेदार कंपन्यांनी हे कामगार पुरवले आहेत. ठेकेदारांकडून त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाहीत, सुट्या मिळत नाहीत, अन्य सवलती कायम नाकारल्या जातात. हे कामगार कंत्राटी असले व ठेकेदार कंपनीकडून आलेले असले तरीही कायद्यानुसार त्यांना वेतन मिळते आहे किंवा नाही, त्यांना नियमानुसार रजा दिल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी महावितरणचीच आहे. अधिकारी ती पार पाडत नाहीत.
कामगार आयुक्तांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. ठेकेदार कंपनी नियमानुसार काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. कंत्राटी असले तरी कामगारांना कामाचे वेतन मिळालायला हवे. महावितरणने ते मिळवून द्यावे असा आदेश आयुक्तांनी दिला.