पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई व्हायला हवी - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 06:26 PM2023-05-16T18:26:52+5:302023-05-16T18:27:04+5:30

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी

Action should be taken against Pune Municipal Deputy Commissioner Madhav Jagtap - Supriya Sule | पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई व्हायला हवी - सुप्रिया सुळे

पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई व्हायला हवी - सुप्रिया सुळे

googlenewsNext

पुणे: पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या मुजोरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अतिक्रमण कारवाई दरम्यान फर्ग्युसन रस्त्यावर एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर त्यांनी गुंडगिरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. माधव जगताप यांनी अक्षरशः खाद्यपदार्थांच्या भांड्याला लाथ मारून उडवून लावले. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी असे त्यांनी ट्विटच्य माध्यमातून सांगितले आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.

5 एप्रिलचे हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. अतिक्रमण विभागाचे एक पथक फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईसाठी गेले होते. या पथकासोबत महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप हे देखील होते. यावेळी माधव जगताप यांनी सगळे ताळतंत्र सोडून अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक केली. त्यांनी खाद्यपदार्थाचे स्टॉल अक्षरशः लाथिने उडून टाकले. यादरम्यान एका कढईत असलेले गरम तेल तेथील कर्मचाऱ्यांच्या अंगावर देखील उडाले. 

शहरात सध्या अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे बड्या धेंड्यांच्या अतिक्रमणावर कारवाई व्हावी म्हणून सातत्याने मागणी होत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा ठिकाणी शेपूट घालणारे माधव जगताप मात्र गरीब व्यावसायिकाचे भांडे आणि स्टॉल लाथेने उडून लावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Action should be taken against Pune Municipal Deputy Commissioner Madhav Jagtap - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.