जादा फी घेणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:18+5:302021-07-11T04:09:18+5:30
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील सर्व खासगी शाळांनी विद्यार्थ्यांची ५० टक्के फी माफ करावी व कोरोनात शाळांनी ज्या सुविधा ...
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील सर्व खासगी शाळांनी विद्यार्थ्यांची ५० टक्के फी माफ करावी व कोरोनात शाळांनी ज्या सुविधा पुरविल्यात त्याचीच फी न आकारता जादा फी घेणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटे यांनी दिला आहे.
जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी किसन खोडदे व अनिता शिंदे यांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने सरपंच योगेश पाटे यांनी निवेदन दिले आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, विकास तोडकरी, अजित वाजगे आदी उपस्थित होते.हे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरी गेल्या तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तसेच अतिवृष्टी व बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलांना शिकवायचं म्हणून ऑनलाईन क्लाससाठी १० ते १५ हजार रुपयेपर्यंत मोबाईल घेऊन प्रत्येक महिन्याला इंटरनेटसाठी खर्च वेगळा करावा लागत असल्याने पालक त्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत खासगी शाळेकडून पालकांना वारंवार फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे तर काही शाळांनी ज्या सुविधा पुरविल्यात त्याचीच फी न आकारता मनमानी पद्धतीने जादा फी घेत आहेत. फी वाढ केल्याने अनेक पालक त्रस्त झाले असून भरमसाठ फी भरायची कशी, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शालेय फी मध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी करण्यात आली आहे.
सरपंच पाटे म्हणाले की, कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून शासनाने ५० टक्के फी सवलत देण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच शाळेच्या पालक समितीमध्ये स्थानिक गावचे सरपंच यांना प्रतिनिधी म्हणून घ्यावे जेणेकरून शाळांकडून सोयीने घेण्यात येणाऱ्या निर्णयांना वचक राहील. तसेच पालकांनी शाळेसंदर्भात आपल्या काही तक्रार असल्यास तक्रार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही केले आहे .
ग्रामपंचायत नारायणगाव व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे निवेदन प्राप्त झाले असून त्यावर योग्य कार्यवाही केली जाईल. शाळांनी कोरोनाकाळात ज्या सुविधा पुरवल्या आहेत त्याचीच फी आकारणी करणे आवश्यक आहे. लवकरच मुख्याध्यापक व खासगी शाळांचीही मिटिंग घेऊ तसेच पाहणी करून त्यांना सूचना देणार असून दोषी आढळणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल.
किसन खोडदे, गटविकास अधिकारी, जुन्नर पंचायत समिती.
१० नारायणगाव
किसन खोडदे यांना निवेदन देताना योगेश पाटे व इतर.