बीडीपी क्षेत्राकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:00+5:302021-03-05T04:12:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील टेकड्या फोडून त्याचे प्लॉटिंग करून बांधकाम केले जात आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्या-त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील टेकड्या फोडून त्याचे प्लॉटिंग करून बांधकाम केले जात आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्या-त्या क्षेत्रातील महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.
जैवविविधतेसाठी राखीव टेकड्या तसेच अन्य टेकड्यांवरही सध्या सर्रास बांधकाम चाललेले दिसते. जमिनीचे सपाटीकरण करून त्याचे तुकडे करून विकण्याचेही काम सुरू आहे. या क्षेत्राचे संरक्षण व्हावे यासाठी महापालिकेने त्यात्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. ते काम काय करतात असा प्रश्न खासदार चव्हाण यांनी उद्विगतेने आयुक्तांना केला. राज्य सरकारने दर सहा महिन्यांनी बीडीपी क्षेत्राचे उपग्रह छायाचित्र काढणे स्थानिक स्वराज्य संस्थेला बंधनकारक केले आहे, ते का केले जात नाही, अशीही विचारणा खासदार चव्हाण यांनी केली.
बीडीपी क्षेत्रातील बांधकामांबाबत होत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, टेकड्यांवरील बांधकामांसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, पाषाण तलावात वाढत चाललेल्या प्रदूषणाबाबत तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, अश्विन होंकण, शिदोरे, नितीन कदम, नितीन जाधव, राकेश कामठे, महेश हांडे, अप्पासाहेब जाधव उपस्थित होते.