परवान्याविना शीतपेय, खाद्य विक्रीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 08:59 PM2018-04-10T20:59:39+5:302018-04-10T21:12:32+5:30
एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांची पाऊले आपोआपच शीतपेयांच्या दुकानांकडे व रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत.
पुणे : उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांकडून पसंती दिल्या जाणा-या सर्व प्रकारच्या शीतपेयांची विक्री अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए)परवाना नोंदणी शिवाय करता येत नाही. परंतु,शहरात अनेक ठिकाणी परवानाविना शीतपेयांची विक्री केली जात आहेत.त्यामुळे एफडीएकडून संबंधित शीतपेय विक्रेत्यांवर व रसवंतीगृह चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांची पाऊले आपोआपच शीतपेयांच्या दुकानांकडे व रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत. उष्ण वातावरणात शरीराला थंडावा देण्यासाठी ज्युस,आईस्क्रीम,लिंबू सरबत,नीरा यांसह ऊसाच्या रसाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. परंतु, प्रत्येक रसवंतीगृह व शीतपेय विक्रेत्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छतेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे बाजारात औद्योगिक वापरासाठी व खाण्यासाठी असे दोन प्रकारचे बर्फ उपलब्ध आहेत.त्यामुळे शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ शुध्द पाण्यापासून व खाण्यासाठीच तयार करण्यात आला आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.यामुळेच पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी पुणे शहरासह पुणे विभागात शीतपेय तपासणीसाठी उन्हाळी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.
महाराष्ट् अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. विना परवाना अन्न व्यावसाय केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल केला जातो. तसेच त्यांना ६ महिने कारावास व ५ लाखापर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घेणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार फळ विक्रेता,भाजी विक्रेता, उपहारगृहे, मिठाई उत्पादक विक्रेते, वाईन, बिअर शॉप, पाणीपुरी ,भेळविक्रेता, हॉटेल्स, बेकरी उत्पादक, आदींनी एफडीएचा परवाना घेणे आवश्यक आहे. त्यानुसार एफडीएकडून परवाना नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. त्यातून हजारो व्यावसायिकांनी परवाना नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे रसवंतीगृह व शीतपेय विक्रेत्यांनी सुध्दा परवाना नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र,उन्हाळा सुरू झाल्यानंतर अनेकांकडून विना परवाना शीतपेयांची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांनी परवाना नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन एफडीएच्या अधिका-यांनी केले आहे.
खाण्यासाठी केवळ पांढरा बर्फ
शीतपेयांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जातो.औद्योगिक वापरासाठी व खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ सारखाच असल्याने कोणता बर्फ खाण्यायोग्य आहे. हे तपासणे अवघड जात होते.परंतु,औद्योगिक वापरासाठी निळ्या रंगाचा बर्फ तयार करावा. तर खाण्यासाठी पांढ-या रंगाचा बर्फ असावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.त्यामुळे एफडीएकडून याबाबत जागृती मोहीम राबविली जाणार आहे, असे एफडीएच्या अधिका-यांनी सांगितले.
एफडीएतर्फे येत्या १५ जूनपर्यंत उन्हाळी मोहिमेंतर्गत शीतपेय विक्री करणा-या दुकानांची व रसवंतीगृहांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात रसवंतीगृहातील स्वच्छता व वापरला जाणार बर्फ यांचा दर्जा तपासला जाणार आहे.एखाद्या विक्रेत्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित ठिकाणी जावून तपासणी करून शीतपेयांचे नमुने घेतले जाणार आहेत.-शिवाजी देसाई ,सह आयुक्त,एफडीए ,पुणे विभाग